आणीबाणी दीपक जेवणे

आणीबाणी

आणीबाणी जाहीर झाली आणि लगेचच मोतीबागेतील संघाचे कार्यालय बंद करण्यासाठी पोलीस आले. पण तसे पाहिले तर तांत्रिकदृष्ट्या हे कार्यालय काही संघाचे नाही. ‘भारतीय संस्कृती संवर्धन संस्था’ यांची ही वास्तू. रीतसर ठराव करून ती संघाला भाड्याने देण्यात आली. तेथे महाराष्ट्र प्रांताचे कार्यालय सुरू करण्यात आले. पहिल्या मजल्यावर ‘भारतीय संस्कृती संवर्धन’ संस्थेचे कार्यालय होतेच. तेव्हा ते बंद करायचे म्हणजे नक्की काय करायचे? असा प्रश्‍न पोलिसांपुढे उभा राहिला. शेवटी खाली कुलूप आणि वरचा मजला उघडा ठेवण्यात आला, कारण आणीबाणीत जरी संघावर बंदी असली तरी त्या संस्थेवर काही बंदी नव्हती.