आणीबाणी

आणीबाणी जाहीर झाली आणि लगेचच मोतीबागेतील संघाचे कार्यालय बंद करण्यासाठी पोलीस आले. पण तसे पाहिले तर तांत्रिकदृष्ट्या हे कार्यालय काही संघाचे नाही. ‘भारतीय संस्कृती संवर्धन संस्था’ यांची ही वास्तू. रीतसर ठराव करून ती संघाला भाड्याने देण्यात आली. तेथे महाराष्ट्र प्रांताचे कार्यालय सुरू करण्यात आले. पहिल्या मजल्यावर ‘भारतीय संस्कृती संवर्धन’ संस्थेचे कार्यालय होतेच. तेव्हा ते बंद करायचे म्हणजे नक्की काय करायचे? असा प्रश्‍न पोलिसांपुढे उभा राहिला. शेवटी खाली कुलूप आणि वरचा मजला उघडा ठेवण्यात आला, कारण आणीबाणीत जरी संघावर बंदी असली तरी त्या संस्थेवर काही बंदी नव्हती. नंतर मग इमारतीचा मुख्य दरवाजा बंद करून व दिंडी दरवाजा चालू ठेवून पोलिसांनी आपल्या परीने हा प्रश्‍न सोडविला.

कौतुकास्पद समयसूचकता

आणीबाणीची घोषणा करून इंदिरा गांधी आपले पद वाचविण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नव्हता. अशा स्थितीत आणीबाणी येऊ घातली आहे आणि त्यात संघावर बंदी घातली जाईल याची पूर्वकल्पना येथील कार्यकर्त्यांना होती. काही सरकारी अधिकार्‍यांकडून तशी सूचना आधीच मिळालेली होती. म्हणून कार्यालयातले बरेचसे महत्त्वाचे सामान घाईगर्दीत बाहेर हलविण्यात आले होेते. आणीबाणी अगदी दरवाजावरच उभी असल्याने अत्यंत कमी वेळेत हे साहित्य हलवायचे होते. त्या वेळी पुण्यातील असंख्य स्वयंसेवकांनी दाखविलेली समयसूचकता आणि धाडस कौतुकास्पद होते. यातील बरेचसे सामान मोतीबागेच्या जवळपास राहणार्‍या अनेक स्वयंसेवकांच्या घरीच नेऊन ठेवण्यात आले. अवघड आणि मोठे सामान मात्र तळघरातच राहिले. त्यात ध्वजस्तंभ, तंबूचे साहित्य, वीज सामान, मोठी भांडी वगैरे साहित्याचा समावेश होता.

संघावर बंदी आल्याने रोजच्या शाखा बंद झाल्या. मोतीबागमधील मुख्य दरवाजाच्या आत पोलीस बसत असत तेथील शाखाही बंद झाली. सुरुवातीचे काही दिवस असेच गेले. नंतर आणीबाणीला विरोध करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला. आणीबाणी विरोधात सत्याग्रह करण्याची सूचना आली, पण तत्पूर्वीच अनेक प्रमुख कार्यकर्ते आणीबाणीतील ‘मिसा’ या बदनाम कायद्याखाली तुरुंगात बंद करण्यात आले होते. त्यात तत्कालीन प्रांत संघचालक बाबाराव भिडे, कार्यालय प्रमुख बाळासाहेब वझे, शरदराव वाघ, व्यंकटेश पेंडसे, शरदराव साठे, चं.रा. जोशी, अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता.

जे भूमिगत झाले होते, त्यांनी मग सत्याग्रहाची आखणी केली. देशभर सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. या काळात फार सावधपणे सूचना दिल्या जायच्या. त्यानुसार स्वयंसेवक एकत्र जमत. त्या वेळी पुण्यातील तीनपैकी एका भागाची जबाबदारी माझ्याकडे होती. सुचनेनुसार स्वयंसेवक एकत्र आले की, स्वयंसेवकांना सत्याग्रहाची योजना, तपशील याची माहिती दिली जायची. कार्यालयांना कुलूपे लावण्यात आलेली. त्यामुळे स्वयंसेवकांच्या घरातच छोट्या-छोट्या गटांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या. सत्याग्रहींच्या तुकड्या निश्‍चित करणे, तारीख, जागा, वेळ व पद्धत ठरविणे हे या अशा बैठकांमध्येच ठरे. एखाद्या मोठ्या चौकात ठरलेल्या वेळी एकत्र यायचे आणि घोषणा देत आणीबाणीचा जाहीर निषेध करायचा, असे सत्याग्रहाचे साधारण स्वरूप असे. थोड्या वेळेत ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचायची. मग अटकेची प्रक्रिया सुरू होई. तीन महिने ते दीड वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होई. या सगळ्या काळात पोलीस जी चौकशी करीत त्यात ते सत्याग्रहींच्या तुकड्या, पद्धत याची कसून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत. संघाचे प्रमुख कार्यकर्ते तर आतमध्ये आहेत, मग बाहेर हे सर्व कोण चालवतंय? असा प्रश्‍न पोलिसांना पडे. जंग जंग पछाडूनही त्यांच्या हाती काही लागायचं नाही. कारण आणीबाणी विरोधातली चळवळ ही काही एका जागी एकवटलेली नव्हती. सगळ्याच भागात ती पसरली होती. पुण्यातही सर्वदूर घराघरातून पसरलेली होती.

पुढील दिशा

सत्याग्रहींच्या तुकड्या तयार करणे, सत्याग्रहाची पद्धत व जागा ठरविणे हे असे काम मी करीत होतो. सत्याग्रही तयार करण्यासाठी त्याच्याबरोबरच त्याच्या घरच्यांचीही मानसिक तयारी करावी लागे. यासाठी घरोघरी फिरावे लागे. अशी सगळी कामे आम्ही गुप्तपणे केली. पुढे 1976 नंतर देशभरातले सगळे सत्याग्रह थांबले. पुढील दिशा काय राहील, हे ठरायचे होते.

आणीबाणीच्या काळात जे तुरुंगात नव्हते, ते भूमिगत राहून काम करीत. उघडपणे काम करणे शक्य नव्हतेच. माझ्या बाबतीत मात्र वेगळा प्रकार होता. आणीबाणी असूनही मी शेठ हिरालाल सराफ हायस्कूलमध्ये (भारत हायस्कूल) नोकरीस उघडपणे जात होतो. नोव्हेंबरच्या मध्यावर एक कार्यकर्ता सांगून गेला ‘‘तू घरी गेलास, तर पोलीस तुला पकडणार. तेव्हा तू घरी जाऊ नकोस.’’ तेव्हा एकूण परिस्थितीचा विचार करून मी दुपारच्या सुमारास शाळेतूनच भूमिगत झालो. यांनतरही मी पूर्वीचेच काम सुरू ठेवले. पुढे सत्याग्रह थांबल्यावर शाळेत रुजू होण्यापूर्वी तेथून निरोप आला की,  ‘‘शाळेत पोलिसांची सूचना आली आहे की, ‘तो’ जर शाळेत आला, तर त्याला तेथेच अडकवून ठेवा. जाऊ देऊ नका! मग मीही तशी मनाची तयारी ठेवूनच 15 मार्च 1976 रोजी शाळेत गेलो. दुपारी पोलीस आले. त्यांनी चौकशी वगैरे केली. नंतर एक अधिकारी म्हणाले, ‘‘बरेच दिवस बाहेर आहेस. तेव्हा दोन दिवस घरच्यांसोबत रहा. नंतर मग आम्ही तुझ्यावर ‘मिसा’चे वॉरंट  बजावू!’’ पोलीस खात्यातील अनेकांना आमच्या चळवळीबद्दल सहानुभूती होती, याचे हे उदाहरण.

मार्च ते जून 1976 या काळात मी ठाणे येथील तुरुंगात होतो. जूनमध्ये मला येरवड्यात हलविण्यात आले. तेथे आमची नऊ जणांची तुकडी होती. हा तुरुंग ‘मिसाबंदी’ खालील कैद्यांनी भरून गेलेला होता. अट्टल गुन्हेगारांसाठीची एक बरॅक आमच्यासाठी मोकळी करण्यात आली होती. या काळात देवरसजीही येरवड्यातच होते. त्यांच्याकडे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागे. एकदा आम्ही अशी परवानगी घेऊन त्यांना आमच्या बरॅकमध्ये जेवायला बोलावले. जेवणासाठी पुण्यातील स्वयंसेवकांच्या घरून डबे मागविलेले होते. खास मेनू होता भाकरी आणि कारल्याची भाजी. कारण बाळासाहेबांना मधुमेह होता. हे जेवण त्यांना खूप आवडले. जेवल्यानंतर एक तासभर त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. या गप्पांमध्ये बाळासाहेबांनी स्वयंसेवकांकडील माहिती विचारली.

आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करून हजारो स्वयंसेवक तुरुंगात गेले, अनेकजण भूमिगत झाले व त्यांनी आणीबाणीविरुद्धचा लढाही चालू ठेवला आणि तुरुंगात कारावास भोगणार्‍या स्वयंसेवकांच्या परिवाराची यथायोग्य काळजीही घेतली, त्यांना सर्व प्रकारे मदत केली. त्यांचा धीर आणि विश्‍वास टिकवून ठेवला.

आणीबाणीच्या कालखंडातील अनुभव सांगताना प्रा. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, ‘‘18 सप्टेंबर 1975 रोजी मला अटक झाली. 22 मार्च 1977 रोजी माझी सुटका झाली. तुरुंगात जाण्यापूर्वी आणीबाणीविरुद्ध सत्याग्रहाची तयारी करणं हे महत्त्वाचे काम माझ्याकडे होतं. तेव्हा मी ‘विद्यार्थी परिषदे’चं काम करीत असे. तात्याराव बापट, वसंतराव केळकर, दामुअणा दाते अशी प्रचारक मंडळी भूमिगत होती. त्या सर्वांशी माझा संपर्क असे. सत्याग्रहींची मन:स्थिती तयार करणं, त्यांच्या घरच्या मंडळींची अनुमती घेणं अशी कामे होती. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातून आपल्या सर्व संघटनांच्या माध्यमातून अठराशे सत्याग्रहींनी सत्याग्रह केला. त्या वेळचे प्रचंड भीतीचे वातावरण पाहता ही संख्या प्रचंडच समजली पाहिजे.

प्रेरक उदाहरण

एका सत्याग्रहीचे उदाहरण खूप प्रेरक आहे. त्याने नाव होते, दिग्विजय प्रशांत कोल्हटकर. महाविद्यालयात तो शिकत होता. सत्याग्रह करण्यास, तो घरातून साध्या कपड्यात बाहेर पडला. त्याला तीन महिन्यांची शिक्षा झाली आणि येरवडा कारागृहात त्याची रवानगी झाली. त्याचे वडील सेशन कोर्टात न्यायमूर्ती होते. ते संध्याकाळी एक सबइन्स्पेक्टर आणि दोन पोलीस शिपायांना घेऊन येरवडा कारागृहात गेले आणि मुलाला घरी चल असे म्हणाले. त्याच्या सुटकेचा आदेश त्यांनी आणला होता. मुलाने घरी येण्यास ठाम नकार दिला आणि शिक्षा भोगूनच परत येईन असे सांगितले.

विलास शेलार, बापू वाघमारे, वत्सला जगताप, असे जे झोपडीत राहणारे होते, त्यांनी अत्यंत हालाखीच्या आर्थिक परिस्थितीत असतानाही त्यांनी सत्याग्रह केला.

व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले शरदभाऊ गंगाधर साठे यांनाही आणीबाणीत अटक झाली होती. एके रात्री अनिल गाडगीळ यांच्या घरी बैठक सुरू असताना त्यांना आणीबाणीबाबतचा निरोप मिळाला. संघबंदीची बातमी समजल्यावर चर्चा झाली व सत्याग्रह करायचा निर्णय झाला. तेव्हा पुण्यातील सत्याग्रहींची व्यवस्था साठे यांच्याकडे सोपविण्यात आली होती, परंतु त्यांनाच अटक झाली व येरवडा येथे कारावासात ठेवण्यात आले. एकूण 18 महिन्यांचा कारावास त्यांना भोगावा लागला.

या येरवड्याच्या कारागृहात पुण्यातील अनेक कार्यकर्त्यांना अटक करून ठेवण्यात आले होते. शरदभाऊ वाघ यांनाही याच कारागृहात ठेवण्यात आले होते. कारावासातील आठवणी सांगताना ते म्हणाले की, ‘‘आणीबाणीत येरवड्याच्या कारागृहात असताना धमाल यायची. विविध विषयांवर चर्चासत्र व्हायची. परमेश्‍वराचं अस्तित्व, मूर्तिपूजा, जातीयता, हिंदुत्व इ. विषयांवरच्या चर्चेत मी भाग घेत असे. तुरुंगात असतानाच आणीबाणी संबंधात लिखाण केले. आपले गिरीशराव प्रभुणे तेव्हा ‘वैनतेय’ नावाचे मासिक चालवीत. त्यात माझी या विषयावर 12 प्रकरणे छापून आली आहेत. आणीबाणीविषयी काय सांगावे? माझा मित्र भाई वैद्य आमच्या बरोबर होता. आणीबाणी जाहीर झाल्या झाल्याच आम्हा तिघांना प्रथम अटक झाली. मी, डॉ. य. ग. केळकर आणि डॉ. वसंतराव राहुरकर! खरं तर डॉ. राहुरकरांचा काही संबंध नव्हता. पोलिसांकडे विचारणा केली की, अहो यांना का अटक केली? तर त्यांचं म्हणणं असं की, दिल्लीहून आदेश आलाय खिींशश्रशर्लींीरश्र ना पकडा म्हणून आम्हाला अटक झाली. थट्टेनं श्रीपती शास्त्रींना अजूनही म्हणतो, ‘‘बघा सरकार दफ्तरी आम्हा तिघांची खिींशश्रशर्लींीरश्र म्हणून नोंद आहे बरं!’’

आठवणी श्रीपतींच्या

डॉ. श्रीपती शास्त्री सांगतात की, ‘‘आणीबाणीच्या काळात मी येरवडा कारागृहात 16 महिने होतो. बाळासाहेबही तिथेच होते. महाराष्ट्रातील 400 च्या आसपास ‘मिसाबंदी’ कारागृहात होते. मुख्य भरणा संघचालकांचा होता. पुण्यातील भूमिगत चळवळीशी कारागृहातील कार्यकर्त्यांचा जीवंत संपर्क राही. काहीजण पॅरोलवर जात, आठवड्यातून बाहेरच्या लोकांशी म्हणजे नातेवाईकांशी एक तासभर भेट मिळत असे, त्यांच्यामार्फत निरोप पाठविले जात. माधवराव मुळेंचा दीर्घकाळ पुण्यातच मुक्काम असे त्यांचा बाळासाहेबांशी संपर्क होता. माधवराव मुळे बाहेरच्या सर्व घडामोडी तपशीलवार लिहून बाळासाहेबांकडे पाठवीत. प्रथम ते सर्व माझ्या हातात येई, मी घेऊन ते बाळासाहेबांना देत असे. त्यांचे वाचन झाले की बाळासाहेबांची सूचना असे ते नष्ट करण्याची. इंदिरा गांधी आणि विनोबा भावे यांना बाळासाहेबांनी लिहिलेल्या पत्राचे हिंदीकरण धुळ्याच्या मदन मिश्रा यांनी केले.

कारागृहात अनेक संघचालक होते. त्यापैकी अनेकांचा डॉक्टरांशी संबंध आलेला होता. एक कार्यक्रम ठरविण्यात आला आणि त्यात डॉक्टरांबरोबरच्या आठवणी, प्रसंग सांगावेत असे निश्चिय करण्यात आले. तीन दिवस रोज तास-दीड तास हा कार्यक्रम चाले. त्यात  तीस-चाळीस लोकांची भाषणे झाली असावीत. यानंतर मी बाळासाहेबांना भेटलो आणि म्हणालो की; ‘‘डॉक्टरांवर तीन-चार बौद्धिकवर्ग तुम्ही द्यावेत अशी सर्वांची इच्छा आहे.’’ तर बाळासाहेब म्हणाले, ‘‘डॉक्टरांच्या कोणाकोणाशी भेटी झाल्या, अमुक अमुक तारखेला ते कुठे भेटले, त्यांचे राजकारण, समाजकारण कसे होते, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही यादवराव जोशींना भेटा. त्यांच्या व्यक्तिगत आवडी-निवडी, स्वभाव याविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही कृष्णराव मोहरील यांना भेटा. संघाचे काम वाढविण्यासाठी त्यांनी कसा विचार केला, याबद्दल तुम्ही मला प्रश्‍न विचारू शकता. त्याची मी उत्तरे देईन. आपणहून विचार करून बोलणे हा माझा स्वभाव नाही. प्रश्‍नोत्तराच्या नंतर झालेल्या कार्यक्रमाची एक आठवण सांगण्यासारखी आहे. कधीही न बोलणारा एक कार्यकर्ता उभा राहिला. तो म्हणाला, ‘‘माझ्या मनात एक प्रश्‍न आहे, पण विचारू का नको असा संकोच आहे. प्रश्‍न विचारला, तर अन्य स्वयंसेवक माझ्यावर रागवतील?’’ बाळासाहेब म्हणाले, ‘‘नि:संकोचपणे प्रश्‍न विचार. प्रश्‍न विचारणारा तू आणि उत्तर देणारा मी आहे. म्हणून अन्य कोणाची चिंता करण्याचे कारण नाही.

त्या स्वयंसेवकाने प्रश्‍न विचारला, ‘‘डॉक्टर हेडगेवारांना रडताना तुम्ही कधी बघितले का?’’ त्याचा हा विचित्र प्रश्‍न ऐकून अनेक स्वयंसेवक हसले. बाळासाहेबांनी त्याच्याकडे काही क्षण पाहिले आणि म्हणाले, ‘‘एकदा मी डॉक्टरांना दु:खातिरेकाने रडताना पाहिलं’’ आणि मग त्यांनी तो कोणता प्रसंग होता ते सांगितले. सहलीला गेले असता दोन प्रमुख कार्यकर्त्यांचे भांडण झाले आणि काही केल्या ते भांडण मिटेना. भांडण सोडवायला डॉक्टर गेले असता ते दोन कार्यकर्ते म्हणाले, ‘‘डॉक्टरजी तुम्ही बाजूला व्हा! डॉक्टर तिथून गेले, एका झाडाखाली रडत बसले. आम्ही सगळे तर लहानच होतो. भांडणारे कार्यकर्ते आमच्यापेक्षा मोठे होते. ज्यांनी कार्यकर्त्यांचा आदर्श उभा करायचा तेच भांडत बसले, हे पाहून डॉक्टरांना रडू कोसळले.

बाळासाहेब शेवटी म्हणाले, ‘‘डॉक्टर हेडगेवारांच्या डोळ्यातून पाणी आणायचे असेल, तर दोन स्वयंसेवकांनी आपापसांत भांडत बसावे.’’

कारागृहात एक स्वयंसेवक होता. काही ना काही कारणामुळे स्वयंसेवकांशी त्याचे रोज भांडण होई. दुसर्‍या दिवशी तो बाळासाहेबांना भेटायला आला आणि म्हणाला, ‘‘मला तुमच्याशी खासगी बोलायचे आहे.’’ बाळासाहेब म्हणाले, ‘‘बोला, आमचे काही खासगी नाही. जवळ बसलेले सर्व कार्यकर्ते आपलेच आहेत तू बोल.’’ तो बाळासाहेबांना उद्देशून म्हणाला, ‘‘कालचे तुमचे बोलणे मी ऐकले आणि रात्रभर ते माझ्या कानात घुमत राहिले. मी झोपू शकलो नाही.’’ बाळासाहेब म्हणाले, ‘‘बरे मग पुढे काय?’’ तो म्हणाला, ‘‘मी तुमच्या साक्षीने आज शब्द देतो की, आजपासून मी कोणाशीही भांडणार नाही?’’

कारागृहाच्या बाहेर असलेले स्वयंसेवक या काळात सत्याग्रह करतच होते. पुणे महानगर कार्यवाह विनायकराव डंबीर यांनी या सत्याग्रहातील काही प्रसंगाच्या आठवणी सांगितल्या.

जगन्नाथराव ऊर्फ बंडोपंत वझे यांनी एक विशेष आठवण सांगितली, ती अशी - जेलमध्ये सर्व उत्सव होत. मकरसंक्रमणाच्या उत्सवाचे एक वैशिष्ट्य असे की तीळगूळ तर सर्व सत्याग्रहींना मिळालाच, पण त्याचबरोबर त्यांना व इतरही कैद्यांनाही मिळाला. आणखी एक गोष्ट पुण्यातील संघप्रेमी बांधवांकडून दिली गेली. संक्रांतीच्या अगोदर पुण्यातील संघप्रेमींना प्रत्येक घरातून निदान पाच—पाच गुळाच्या पोळ्या घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले होते. संघाचे स्वयंसेवक त्याचबरोबर ‘राष्ट्रसेविका समिती’च्या सेविकांनी हे काम अतिशय चोखपणे पद्धतशीरपणे पार पाडले. समाजाचा प्रचंड प्रतिसाद त्यास मिळाला. पुण्यातून जवळ जवळ एक ट्रकभर गुळाच्या पोळ्या जमविण्यात आल्या. त्या पोळ्या संक्रांतीच्या दिवशी तुरुंगात पोहोचविण्यात आल्या. संघ स्वयंसेवकांबरोबर इतरही जे राजकीय बंदी होते त्यांना तसेच जेलमधील जे शिक्षा झालेले कैदी होते त्यांनाही पोळ्या देण्यात आल्या. सर्वांना फारच आश्‍चर्य व कौतुक वाटले. अशा प्रकारची घटना फक्त जेलमध्येच समाजातील संघाच्या आस्थेपणा, प्रेम, आपलेपणामुळे घडू शकली.

विविध प्रसंग

पुणे शहरात ठिकठिकाणी सत्याग्रह झाले. अशाच एका सत्याग्रहाच्या वेळचा प्रसंग. माणके नावाचे एक स्वयंसेवक होते. ते स.पा. महाविद्यालयात नोकरी करीत. त्यांना सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी या गोष्टीस नकार दिला. ठरल्यावेळी सत्याग्रह झाला. माणके तेथे होते. त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला नाही. पोलीस आले. त्यांनी सत्याग्रहींना अटक करून गाडीत बसवले. पोलिसांची गाडी सत्याग्रहींना घेऊन जाणार इतक्यात माणकेंनी सत्याग्रहींचा सत्कार करण्यासाठी म्हणून उत्फूर्तपणे पोलिसांच्या गाडीला हार घातला. लगेचच पोलिसांनी माणकेंनाही अटक करून गाडीत बसविले.

आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रकाश जावडेकर त्यावेळी पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थी होते. त्यांनी विद्यापीठाच्या कँटिनमध्ये सत्याग्रह केला. आणीबाणी विरोधातील घोषणांनी केवळ कँटिनच नव्हे, तर विद्यापीठाचा परिसरही दुमदुमून गेला. पोलीस आले, पण त्यांना विद्यार्थ्यांनी सहजा-सहजी दाद दिली नाही. बरीच पळापळ झाल्यानंतर मग कुठे जावडेकर आणि त्यांच्या काही सहकार्‍यांना अटक करता आली.

सत्याग्रहाच्या संदर्भातील असाच एक मजेशीर प्रसंग किशोर शहा या तरुण स्वयंसेवकाच्या बाबतीत घडला. पुण्यात त्या वेळी दुमजली बसगाड्याही चालत. 15 ऑक्टोबरला अशाच एका दुमजली गाडीच्या टपावर किशोर शहा चढून बसला आणि त्याने तेथे सत्याग्रह पुकारला. त्याला तेथून खाली आणून अटक करेपर्यंत पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

आणीबाणीच्या काळातील घटनांचा उल्लेख करताना विनायकराव डंबीर पुढे म्हणाले... आणीबाणीच्या काळात दामुअण्णा आणि तात्या बापट हे दोघेही भूमिगत होते. आणीबाणी विरोधातील लढ्याच्या समन्वयाचे पुण्यातील काम दामुअण्णा आणि तात्यांच्या सल्ल्याने प्रामुख्याने विजय कापरे पाहत. अटक झालेल्या सत्याग्रहींना तुरुंगात भेटणे, त्यांच्यासाठी घरच्या जेवणाची व्यवस्था करणे, भूमिगतांच्या बैठका, सत्याग्रहाची आखणी आणि अंमलबजावणी अशी सगळी कामे या काळात स्वयंसेवकांनी मोठ्या निर्धाराने केली.

तुरुंगात गेलेल्यांपैकी अनेक स्वयंसेवकांच्या घरची आर्थिक स्थिती फार चांगली होती असे नव्हे. अनेकजण नोकरी करीत. त्यांच्या घरी कमावणारे असे ते एकटेच असत. तुरुंगात गेल्याने त्यांची मिळकत बंद झालेली. अशा स्थितीत त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हेही महत्त्वाचे होते. त्यासाठी आर्थिक मदत गोळा केली जायची. अशी मदत गोळा करण्यात आली. ती योग्य जागी पोहोचविण्यात तात्या बापट यांचे कार्य फार मोठे आहे. संघाच्या कार्यासाठी निधी जमा करण्यातील तात्यांचे कौशल्य खासच होते. यासंदर्भातील एक उदाहरण खास उद्धृत करण्यासारखे आहे. पुण्यातील चितळेबंधू मिठाईवाले हे व्यावसायिक संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मुलाचे लग्न होते. त्याच्या आदल्या दिवशी तात्या चितळेंच्या घरी गेले आणि 10 हजारांची वर्गणी घेऊन आले. तुरुंगात गेलेल्या स्वयंसेवकांच्या घरच्या स्थितीबद्दल तात्या अत्यंत संवेदनशील असत. मनोहरपंत राईलकर हे स.पा. महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते ‘मिसाबंदी’ म्हणून तुरुंगात गेल्याने त्यांचा पगार बाद करण्यात आला. त्यांच्या घरी अर्थातच आर्थिक ओढाताण सुरू झाली. हे तात्यांना समजल्यानंतर ते त्या महाविद्यालयातील संबंधितांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यांनी ‘मिसाबंदी’ असल्यामुळे राईलकरांना पगार देता येत नाही, अशी कायदेशीर अडचण सांगितली. यावर तात्या खूप रागावले. त्यांना इतके संतापलेले पूर्वी कधी कोणी पाहिले नव्हते. तात्यांनी त्या अधिकार्‍यांना खडसावले आणि म्हणाले, ‘असा रीतसर पगार देता येत नसेल, तर तुमच्या खिशातून देत चला. तात्यांचा रुद्रावतार पाहून उपस्थित सगळेच पार हबकून गेले. मात्र त्यानंतर लगेचच राईलकरांच्या घरी नियमित मदत जाईल, अशी व्यवस्थाही करण्यात आली.

तुरुंगात असलेल्यांसाठी शहरातून मोठ्या प्रमाणावर जेवण-न्याहरीसाठी डबे जमा होत. राज्यभरातील ‘मिसाबंदीं’ना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे पुण्यातील स्वयंसेवकाचे प्रामुख्याने काम झाले होते. बाबांचे घर हे स्वयंसेवकांचे जसे हक्काचे घर होते, तसे ते शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या कामासाठी सोयीचेही होते. प्रभाकर भट या कामाची आखणी करत. शहरातून जमा झालेले असे डबे बाबांच्या घरी एकत्र केले जात आणि तेथून ते मग तुरुंगात पोहोेचविण्यात येत असत.

आणीबाणीच्या काळात संघ स्वयंसेवकांना समाजाच्या सर्व स्तरांतून मदत लाभली, या मदतीबाबत सांगताना प्रा. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की, ‘‘दहा-बारा उद्योगपतींनी सर्व प्रकारची मदत केली. शंतनुराव किर्लोस्करांनी जवळ जवळ 18 कार्यकर्ते पॅरोलवर घेतले. त्या काळात ते 18 कार्यकर्त्यांचे मिळून 30 हजार रुपये देत असत. त्यांचे एक गायतोंडे नावाचे ऑफिसर होते. शंतनुरावांनी सांगितले की, त्यांच्या घरी जाऊन जसजसे लागतील तस तसे पैसे घ्यायचे. तुरुंगात जायच्या आधी मी ते आणत होतो. नंतर गोविंदराव मोडक यांनी आणायला सुरुवात केली. जवळ जवळ चार लाखांची मदत त्यांनी केली. शरद कानिटकर या कार्यकर्त्याची आई सर्व ‘मिसाबंदी’च्या घरी जाऊन हे पैसे देत असे. किती पैसे द्यायचे, कसे द्यायचे हे आधीच त्यांना सांगितलेले असायचे. अरुण दोशी, नवलमलजी फिरोदिया यांची मदत लाभली होती. फिरोदियांना आम्ही म्हणालो, आमचे कार्यकर्ते तुरुंगात आहेत. मदत केली पाहिजे. त्यावेळी त्यांनी डोक्यावरची टोपी काढून एक मोठी खूण दाखवली आणि म्हणाले, ‘‘ही कसली खूण आहे, माहीत आहे? तुमच्या संघ कार्यकर्त्यांनी 1948 साली माझ्या डोक्यात दंड घातला होता त्याची ही खूण आहे.’’ सगळी चर्चा झाल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही आज हे काम जितकं संघटितपणे करताय तसे कोणीही करीत नाही.’’

आणीबाणीच्या काळात अनेक स्वयंसेवकांच्या नोकर्‍या गेल्या, त्या वेळी बाबांनी हिमतीने एक बँक स्थापन केली. ब्रुक बाँडच्या लोकांशी बोलून अनेक स्वयंसेवकांना एजन्सी मिळवून दिली. एक काळ असा होता की, ब्रुक बाँण्डचे सगळे एजंट दहा-बारा वर्षे संघ स्वयंसेवकच होते. ही सगळी व्हिजन बाबांची होती, शास्त्रींची होती, तात्यांची होती.

आवश्यक सावधगिरी

आणीबाणीच्या काळात दादासाहेब बेंद्रे जन संघाचे काम करत होते. ते पदाधिकारी नसल्यामुळे अटक वगैरे झाली नाही, पंरतु आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत, असे निरोप त्यांना आले होते. त्याप्रमाणे त्यांनी तयारीही करून ठेवली होती, वळकटीही बांधून ठेवली होती.

वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. संघ-जनसंघाच्या लोकांवर गुप्तहेरांची सतत नजर असायची. त्यावेळी जे तुरुंगात होते व ज्यांच्यावर त्यांच्या घरमालकांनी दावे लावले, कोणताही मोबदला न घेता ते दावे दादासाहेबांनी लढवले. आणीबाणीत कायद्याच्या बाबतीतील, कोर्टकचेरीची वगैरे बरीच कामे त्यांनी केली. त्यांचे या काळात वकील म्हणून अधिक काम राहिले.

आणीबाणीच्या काळात माधवराव मुळे सहकार्यवाह होते. त्या वेळी मुकुंदराव कुलकर्णी पक्षाचे आमदार होते. मुळे यांनी त्यांना सांगितले होते की, ‘‘देशभरातील कार्यकर्त्यांशी तुम्हाला संपर्क ठेवायचा आहे. त्यासाठी देशभर प्रवास करा, पण स्वत:ला अटक करून घेऊ नका.’’ अशा रीतीने त्यांच्यावर ही संपर्काची जबाबदारी टाकण्यात आली. त्यासाठी मुकुंदराव महिन्यांतील वीस-बावीस दिवस प्रवासातच असत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत, त्यांना हिंमत देत. आवश्यक सावधगिरी घेतल्यामुळे त्यांना अटक झाली नाही.

आणखी एक आठवण सांगताना शरदराव घाटपांडे म्हणाले की, ‘‘आणीबाणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुरुंगात आणि बाहेरही हवा अशी होती की, आणीबाणी आणि संघबंदी आता कायमच राहणार आहे. मन खचून जावे असेच हे वातावरण. या पार्श्‍वभूमीवर बाळासाहेब आम्हाला म्हणाले, ‘‘पुढल्या वर्षीच्या दसर्‍याला आपण गणवेशात रस्त्यावरून संचलन करणार ही खात्री बाळगा!’’ हे ऐकताच आम्ही आश्‍चर्यचकितच झालो. एकदम उत्साहही संचारला. बाळासाहेब पुढे म्हणाले, ‘‘आपण आतमध्ये असल्याने बाहेर जे घडत आहे, ते आपल्याला कळत नाही. बाहेर जनता आणीबाणीविरोधात एकवटत आहे. सर्व प्रकारच्या बंदीमुळे सर्वसामान्य माणूस चिडलेला आहे.

‘अनुशासन पर्वा’चा धाक लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. सर्व ठिकाणची दडपशाही पाहून सामान्य माणूस चिडलेला आहे. सत्याग्रह आणि ‘मिसाबंदी’खाली स्वयंसेवक फार मोठ्या संख्येने होते. ते काही देशद्रोही नव्हते, पण त्यांच्यावर आरोप न ठेवता त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. याचाही राग सगळीकडे आहे. याचा उद्रेक लवकरच होईल व स्वयंसेवक निष्कलंक बाहेर येतील याची खात्री आहे.’’ आणि घडलेही अगदी तसेच. 1977 च्या दसर्‍याला स्वयंसेवकांचे गणवेशात मोठे संचलन झाले. आपल्या नेत्याच्या उद्गारांची प्रचिती आम्हाला अशी आली.

‘नेता ऐसा मिळे आम्हाला,

काय असे मग उणे,

यशाने दुमदुमवू त्रिभुवने!’

या ओळी अशा वेळी आपोआपच आठवतात.

तुरुंगात असताना माझी तीन महिने पॅरोलवर सुटका झाली होती. मुदत संपल्यावर पुन्हा आत गेलो. बाळासाहेबांना भेटलो. त्यांनी पुण्यातील मानसिकता, सर्वसामान्य जनता आणीबाणी विषयी काय बोलते याची माझ्याकडे चौकशी केली. बाळासाहेब सकाळी, संध्याकाळी बरंकबाहेर फेर्‍या मारीत असत. अशा वेळी त्यांच्यासोबत फेर्‍या मारतच बोलावे लागे. मीही त्यांना फेर्‍या मारतच माहिती दिली.

येरवड्यातील तुरुंगात राज्यभरातले स्वयंसेवक एकत्र ठेवण्यात आले होते. पुण्यातील स्वयंसेवकांच्या घरून, अधूनमधून जेवणाची चांगली सोय करण्यात येई. एक डबा चौघांना पुरेल असा असायचा.  येरवड्यातील ‘मिसाबंदीं’साठी जेवण आणि इतर खाद्य पदार्थांच्या वाटपासाठी तुरुंगाबाहेरील कार्यकर्त्यांनी एक यंत्रणाच उभी केली होती. डब्याव्यतिरिक्त पोतंभर भेळ, लाडू, चिवडा असेही पाठवले जायचे. कुणाच्या घरी काही कार्यक्रम असला की, तेथूनही विविध पदार्थांचे डबे तुरुंगात यायचे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील सहानुभूती या कृतीतून व्यक्त होई.

सकाळी न्याहरी झाली की बैठकी होत. दुपारच्या जेवणानंतर चर्चेचा कार्यक्रम असे. याशिवाय बौद्धिक वर्गांचे आयोजनही असायचे. दिवसभर असे भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे वेळ व्यवस्थित निघून जायचा. येरवड्यात गोपाळराव देशपांडे हे संघ प्रचारक खूप आजारी होते. त्यांचे तुरुंगातच निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत मी ‘मिसाबंदीं’चा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलो.

दीर्घकाळ चाललेली ही बंदी अखेर जेव्हा उठविण्याची घोषणा झाली, तेव्हा पुण्यात जवळपास पंचवीस ठिकाणी ढोल-ताशे वाजवून जाहीर आनंद व्यक्त करण्यात आला.

नका विसरू, गाय वासरू!

गाय—वासरू ही काँग्रेस पक्षाची अनेक वर्षांची जुनी निशाणी होती. त्यावरून ‘नका विसरू, गाय वासरू’, ‘निशाणी काय? वासरू गाय!’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्ते देत. तर त्याला उत्तर देणारे ‘लहान वासरू — पाडशी गाय, शेतकर्‍याला करायची काय?’ असा टोलाही हाणत. आणीबाणीच्या काळात संघाचे पुण्याचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंतराव गोगटे यांच्या घरी चक्क गाय आली तीही वासरासहित. नुसती आलीच नाही, तर आणीबाणीला कसून विरोध करणार्‍या अनेक भूमिगतांसाठी तिने दुधाची सोयही कशी केली, याचा किस्सा अनंतराव आजही मोठ्या उत्साहाने सांगतात —

‘‘वैकुंठच्या परिसरातल्या अनंतरावांच्या बंगल्याशेजारी तेव्हा आजच्या इतकी वर्दळ नव्हती. अनेक बंगले तेथे होते आणि मोकळ्या जागाही होत्या. अनंतरावांकडे अनेक भूमिगत स्वयंसेवक येत असत. त्यांचा मुक्कामही होई. एकदा बंगल्याजवळील रस्त्यावर एक गाय आली.  झाडाखाली ती उभी राहिली. तिच्यासोबत कुणीच नव्हते. बराच वेळ ती तशीच होती. म्हणून अनंतरावांच्या घरातील मंडळींनी जवळ जाऊन पाहिले, तर ती गाभण असल्याचे दिसले. भूतदया म्हणून तिला काही खायला दिले. तिला न्यायला सायंकाळपर्यंत कोणी आले नाही. म्हणून मग बंगल्याच्या आवारात आणून ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशीही तिचा शोध घेत कुणी आले नाही. अखेर तेथेच ती प्रस्तुतही झाली. तिच्याबरोबरच तिच्या वासराचीही काळजी घेण्याची जबाबदारी गोगटे कुटुंबीयांवर आली. तिच्यासाठी चारा मिळवणे, वासराची देखभाल सगळे काही त्यांनी मनापासून केले. सर्वसाधारणपणे गायीला चार आचळे असतात. या गायीला पाच आचळे होती, हे तिचे वैशिष्ट्य. तिचे सगळे दूध वासराला पिऊ देणे प्रशस्त नव्हते. त्याला ते पचले नसते. मग गोगटेंच्या घरच्या मंडळींनी दुधाची धार काढणेही शिकून घेतले. ती गाय दूधही चांगले देई. अनंतराव सांगतात ‘‘आणीबाणीच्या काळात घरी आलेल्यांची व्यवस्था करताना आम्हाला या गायीमुळे दुधाची कमतरता कधीच भासली नाही.’’ ही गाय पुढे 25 वर्षे मरेपर्यंत तेथेच त्या कुटुंबाचा एक घटक बनून राहिली.

आणीबाणी उठल्यानंतर काँग्रेसच्या एका ओळखीच्या बाईंनी अनंतरावांना म्हटले, ‘‘तुमच्याकडे आमचे गाय—वासरू असल्याचे ऐकले!’’ त्यावर अनंतराव लगेच उत्तरले, ‘‘काय करणार? तुम्ही त्यांना वार्‍यावर सोडल्यावर कुणीतरी आश्रय दिलाच पाहिजे.’’

शब्दांकन : दीपक जेवणे