लोकशाही रक्षणासाठी सत्याग्रह

पुढारीपणाचे फायदे व तोटे या दोन्ही गोष्टींचा अनुभव अलीकडे मला येत आहे. संघात जयजयकार कधी फारसा होत नाही. व्यक्तिशः आपण करूही देत नाही; परंतु सध्या सत्कार, स्वागत समारोह चालू आहेत. गळ्यात हार पडत आहेत. भाषणांतून, लेखांमधून प्रशंसा होत आहे. ‘हे सारे बरे आहे’ असे वाटत नाही, असे काही म्हणावयाचे कारण नाही. परंतु पुढारीपणाचा दुसराही अनुभव आहे. पुढारी पुढे असतो आणि लोक मागे असतात. मागे असलेले लोक त्या पुढार्‍याला असे काही पुढे ढकलत असतात की त्याला मागे फिरणे किंवा इकडे तिकडे वळणे याची शक्यता फारशी नसते. असाही जो पुढारीपणाचा अनुभव आहे — लोक पुढार्‍यास ढकलताहेत आणि तो पुढे चालला आहे —तसाच गुंगीत, नशेत असा बराचसा कार्यक्रम सध्या चालू आहे. त्यामुळे काही वेळेस विचारांची नीट जुळवाजुळव करून विषय मांडणे कठीण जाते. बोलणेही औपचारिक होते, असा अनुभव आहे. आजही कदाचित येथे जो कार्यक्रम ठरला असेल त्यानुसार येथे उशिराच आलो असेन. गाडीतून उतरून येथे यापूर्वी वेळेवर येणे, कितीही घाई केली असती तरी अशक्यच होते.

माझा प्रवास सर्वत्र सुरू आहे. प्रवासांत सार्वजनिक भाषणे, प्रतिष्ठितांच्या सभा आणि पत्रकार-परिषदा असे सामान्यतः कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांना वर्तमानपत्रांतून भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत मी काय विषय मांडतो आहे, याची जाणीव आपणा सर्वांना आहेच.

लोकविलक्षण अनुभव

एका मोठ्या संकटातून, मोठ्या दिव्यांतून आपण बाहेर आलो आहोत. ज्या पद्धतीने आपण बाहेर आलो आहोत, तोही एक केवळ हिंदुस्थानच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासांतील लोकविलक्षण अनुभव आहे. काही बंधू याला ‘हा अपघात आहे’ असेही म्हणू शकतात; परंतु ज्यांचा परिस्थितीचा नीट अभ्यास आहे त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, या परिस्थितीला कलाटणी देण्यामध्ये फार मोठा किंवा मुख्यत्वे करून आपलाच सहभाग राहिला आहे. परंतु मी जेव्हा परिस्थितीचे निदान करतो, झालेल्या या दोन वर्षांतील कालखंडाचे निदान करतो, तेव्हा जसे दुसर्‍या महायुद्धासंबंधी म्हटले गेले आहे, तसे म्हणावेसे वाटते. दुसर्‍या महायुद्धासंबंधी असे म्हटले आहे की, ‘One man Churchil and 20 miles of English channel stood between Hitler and his Victory ‘s(हिटलर आणि त्याचा विजय यांच्यामध्ये एक मनुष्य चर्चिल आणि वीस मैल लांबीची इंग्लिश खाडी होती.) मी जर या वेळी असे विधान केले, ‘One man Jayaprakash and RSS stood between Dictatorship and Democracy’ तर हे विधान अतिशयोक्तीचे होणार नाही, येवढ्या मोठ्या प्रमाणांमध्ये या वेळेला आणि या सगळ्या परिस्थितीला कलाटणी देण्यामध्ये आपला सहभाग राहिला आहे.

हे जे काही घडले आहे, ते अर्थातच सहजासहजी घडलेले नाही. आपण जे आपले कार्य 50 वर्षे केलेले आहे, ते कार्य याला कारणीभूत आहे. प्रत्यक्ष संकट समोर आल्यानंतर त्या संकटाला तुम्ही-आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने धैर्याने तोंड दिले, ते याला प्रमुख कारण आहे.

संघाविषयी विपरीत कल्पना

संघावर बंदी येण्यापूर्वी तीन-चार महिने अगोदर एका साप्ताहिकाने ‘संघावर बंदी घालावी काय?’ या विषयावर एक विशेषांक काढला होता. त्या अंकांत अनेक विचारवंतांनी, अनेक पुढार्‍यांनी लेख लिहिले होते. अनेक संस्थांच्या प्रमुखांनीही लेख लिहिले होते. त्यापैकी काही बंधू योगायोगाने येरवडा येथील कारागृहात आमच्याबरोबर होते. त्यांच्यापैकी अनेकांनी असा विचार प्रकट केला होता की, ‘‘संघावर प्रतिबंध लावण्याची काही आवश्यकता नाही. या संघाला सोडून द्या; हा आपल्याच मरणाने मरेल. येथे काही ध्येयवाद नाही. काही दृढता नाही. परिस्थितीला तोंड देण्याची काही क्षमता नाही आणि काळाच्या ओघात तो आपोआपच नष्ट होईल; त्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही.’’ अशा प्रकारचे विचार अनेकांनी प्रकट केले होते. कोणी म्हणायचे, ‘‘हे मध्यमवर्गीय लोक आहेत.’’ कोणी म्हणायचे, ‘‘हे पांढरपेशे लोक आहेत.’’ कोणी म्हणायचे, ‘‘थहळींश लश्रिश्ररीशव लोक आहेत. त्यात वकील, डॉक्टर, व्यवसायी आहेत. तेव्हा यांचा दम काय?’’ अनेकांचे असे विचार होते.

देशात आणीबाणीची परिस्थिती पुकारण्यात आली. त्यानंतर सरकारचे मुख्य लक्ष आमच्याकडे होते. आमचे हजारो बंधू तुरुंगात गेले. तेव्हा स्वाभाविकच आम्हालाही कुतूहल होते की, ‘काय होणार यांचे!’ संघाबाहेरच्याही जगामध्ये ‘‘आता संघाचे स्वयंसेवक कसा काय व्यवहार करणार’’ ही जिज्ञासा होती. सरकार तर धरून चालले होते की, ‘आता संघ संपला!’ज्यांनी सरकारवर वजन टाकून सरकारच्या मनामध्ये विष कालविले आणि संघावर बंधन यावे यासाठी सारखा प्रयत्न केला ते तर हर्षभरितच झाले होते. त्यांनी म्हणायलाही सुरुवात केली होती की, ‘‘संघ संपला Sangh has proved itself as a paper tiger. संघ हा कागदी वाघ निघाला.’’

संघ स्वयंसेवकांचा व्यवहार

हे सारे असे असताना संघामधील जे बंधू कारागृहात होते त्यांनी तेथे जो व्यवहार केला, तो व्यवहार आपल्याला मोठा आश्‍चर्यकारक वाटत नसला तरी तो संघाबाहेरील लोकांना फारच आश्‍चर्यकारक वाटला, अनपेक्षित वाटला. येरवड्याच्या कारागृहात, इतर विचारांचे, संस्थांचे जे बंधू होते, ते मला भेटायचे. विचारावयाचे की, ‘हे कसे काय होऊ शकते?’ तेव्हा मी त्यांना सांगायचे की, ‘‘तुम्ही कधी संघाचा नीट विचार करण्याचा प्रयत्नच केला नाही. एक तर तुम्ही संघाकडे दोषैकदृष्टीनेच पाहिले किंवा ‘संघावर टीका कशी करावी?’ येवढाच विचार तुम्ही केला आणि म्हणून कुठे ‘चड्डीवाले,’ कुठे ‘निकरवाले,’ कुठे ‘दक्ष-आरामवाले’ असे शब्दप्रयोग वापरून तुम्ही आमची थट्टा केली. परंतु संघस्थानावरील एका तासाच्या कार्यक्रमात आमची केवढी मोठी संस्कारक्षमता दडली आहे, या गोष्टीची जाणीव तुम्हाला नाही. म्हणून तुम्हाला याचे आश्‍चर्य वाटते. आम्हाला काही आश्‍चर्य वाटत नाही. उलट यापेक्षाही अधिक संघाच्या स्वयंसेवकांचा प्रतिसाद मिळावयास पाहिजे होता असे आम्हाला वाटते.’’ अशा प्रकारे मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझी कल्पना आहे की अनेक बंधूंना माझे हे म्हणणे समजू पण शकले. तेव्हा हा झाला कारागृहांतील स्वयंसेवकांचा व्यवहार!

कुटुंबियांचे धैर्य

स्वयंसेवकांच्या घरच्या कुटुंबीय मंडळींची मानसिक स्थिति काय असावी हे आपण समजू शकतो. घरचा कर्ता पुरुष विशेषतः कमाई करणारा पुरुष कारागृहात गेल्यानंतर घरी काय संकटे उद्भवू शकतात हे आपण समजू शकतो. तसे म्हटले तर, सार्वजनिक कार्यकर्त्यांसंबंधी माझा अनुभव असा आहे की, सार्वजनिक कार्यकर्ता नीट कार्य करू शकत असेल तर त्याचे 50% श्रेय स्वाभाविकपणे त्याच्या पत्नीकडे जाते.

इतरांचे साहाय्य

देशात आणीबाणीची स्थिती पुकारल्यामुळे जी आपत्ती आली होती, ती इष्टापत्तीच ठरली. याचे मुख्य श्रेय संघाच्या स्वयंसेवकांनाच आहे. आता माझ्या गळ्यात हार पडतात त्याला काही उपाय नाही. तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यात हार घालणे शक्य नाही. तेव्हा प्रतीक म्हणून माझ्या  गळ्यात हार पडतात; पण मला या गोष्टीची जाणीव आहे की, संघाचे बल हे सरते शेवटी संघाच्या स्वयंसेवकांतच आहे. तेव्हा या सर्व गोष्टींचे श्रेय आहे ते मुख्यत्वेकरून संघाच्या स्वयंसेवकांनाच आहे.

कारागृहांतील वातावरण

आणखीही एक गोष्ट मी आपल्यापुढे मांडू इच्छितो. ती अधिकार्‍यांच्याही लक्षात आलेली आहे. ती अशी की, आपण कारागृहांत होतो ते ठीक होते. कारागृहांत नीट वागवायचे, तिथले वातावरण शक्यतो बिघडू  द्यावयाचे नाही, एवढीच जबाबदारी तेथे होती. हीही जबाबदारी काही  सोपी नव्हती. कारण असे की, ज्यांचे बरेचसे वय झालेले आहे असे अनेकजण होते. त्यांच्या घरी पत्नी, पुत्र, पौत्र, प्रपौत्र आहेत अशी मंडळी त्यात होती. आपल्या धंद्यामध्ये अत्यंत यशस्वी असलेले, व्यवसायांत विशिष्ट स्थान मिळविलेले असे बंधू होते. सामाजिक कार्यामुळे समाजात ज्यांना विशेष स्थान आहे असेही बंधू त्यात होते. अशा बंधूंचे एक विशेष व्यक्तिमत्त्व असते. या सर्वांसाठी एक वाईटच शब्द वापरावयाचा झाला - वाईट शब्द वापरण्याची इच्छा नाही, पण दुसरा सुचत नाही म्हणून वापरतो - तर त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अहंकार असतो. असे शेकडो बंधू कारागृहांत होते. 500 बंधू येरवड्यात, 500 बंधू नागपूरला व 1500 बंधू नाशिकला होते. आता अशा स्थितीत एक महिना, दोन महिने, वीस महिने काढावयाचे सोपे नाही. लहान-सहान गोष्टींवरून कसे गैरसमज होतात, कसे अपसमज होतात, कशी भांडणे होतात याचा गृहस्थी जीवनाचाही आपला अनुभव असतो. तेव्हा असे सर्व बंधू एकत्र आल्यानंतर ही काही सोपी गोष्ट नव्हती की, सर्वांनी हा काळ जसा काही तीन दिवसांच्या शिबिरात घालवतात तसा वीस महिन्यांच्या शिबिरात सरकारी खर्चाने  घालवायचा. ही सोपी गोष्ट नव्हती. फार कठीण गोष्ट होती.

सत्याग्रहाचा अचूक निर्णय

आतल्या लोकांची मनःस्थिती नाजूक असणे स्वाभाविकच आहे. कुणाला कारागृहात राहावयाचे असते? हा शौक असतो काय? कारागृहातून बाहेर यावे, अशी इच्छा सर्वांनाच असते. पण बाहेरील काही बंधूंवर ‘या वेळी काय निर्णय घ्यावा आणि काय घेऊ नये’ याचे दायित्व होते. त्यांची काय स्थिती झाली असेल ते आपण समजू शकतो. त्यांच्या पुढे विविध पर्याय यावयाचे. विविध सुझाव यावयाचे. ‘हे असे करणे इष्ट होईल? तसे करणे इष्ट होईल?’ याचा निर्णय घेण्याची जबाबदारी 15-20 लोकांवर होती. 26 तारखेला आणीबाणीची परिस्थिती पुकारली गेली. 27 ला सकाळीच काही बंधू मला येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितले की, ‘बहुतकरून तुम्ही पकडले जाल!’ तेव्हाच मी त्यांना सूचना दिली की, तुम्ही बाहेर राहावयाचे आणि यापुढे तुम्हालाच सर्व निर्णय घ्यावयाचे आहेत. त्याप्रमाणे ते बंधू शेवटपर्यंत बाहेर राहिले आणि त्यांनी निर्णय घेतले. पण निर्णय घेताना त्या बंधूंची अवस्था किती कठीण झाली असेल? त्यांच्यासमोर कशा निरनिराळ्या प्रकारच्या सूचना आल्या असतील? पहिली सूचना तर हीच आली असेल की, ‘‘काही करू नये. इतके भयंकर वादळ आहे, इतके भयंकर तुफान आहे, इतके भयंकर संकट आहे की, साष्टांग लोटांगण घालून जमिनीवर झोपून जावे.’’ नारायणास्त्राचे असे वर्णन आहे असे मला वाटते. नारायणास्त्र सोडले गेले की त्याच्यापासून संरक्षणासाठी साष्टांग नमस्कार घालून जमिनीवर पडून राहावयाचे. तेव्हा अशा प्रकारचे भयंकर संकट आहे. सत्ता अत्यंत प्रभावी आहे, ती अशा एका व्यक्तीच्या हाती आहे जी अत्यंत जिद्दी आणि हट्टी आहे, तेव्हा आपण काही जरी केले तरी आपल्याला भोगावे लागेल. म्हणून आपण काही करूच नये. चार महिने, सहा महिने, आठ महिने, बारा महिने कळ काढावयाची आणि आशा करीत राहावयाचे की, संकट आज ना उद्या टळेल. असाही विचार त्यांच्यापुढे आला. पण हा विचार जर त्यांनी मान्य केला असता, तर संघाला समाजामध्ये काय स्थान राहिले असते? संघाच्या स्वयंसेवकांची संघटना तर आहेच. तेव्हा हाही प्रश्‍न उपस्थित झाला की, तुमच्यावर एवढा मोठा अन्याय झाला, अत्याचार झाला, भलभलते आरोप झाले, संघावर बंदी घातली, 25000 बंधूंना ‘मिसा’मध्ये आणि शेकडो बंधूंना ‘डी.आय.आर.’ मध्ये टाकण्यात आले. तेव्हा इतके झाल्यानंतर काही करावयास आपले धाष्टर्य नाही, धैर्य नाही, काही क्षमता नाही तर मग समाजाने संघात यावयाचे कशाला? आणि समाजाने संघाला सहकार्य तरी द्यावयाचे कशाला? आणि मग, हे चालू असलेले ज्यांना नापसंत आहे अशा या देशामधील ज्या काही शक्ती असतील त्यांनी कोणाच्या भरवशावर उभे राहायचे? येथील लोकशाहीचा अस्त होत आहे तो नापसंत असणारे विचारप्रवाह जगामध्येही असतील; पण या देशातील लोकच जर काही करणार नाहीत, तर त्यांनी तरी तोंड का उघडावयाचे? तेव्हा काही न करण्याचा विचार बरोबर नाही, काही तरी केले पाहिजे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला. हा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला असेल तेव्हा कारागृहातील काही बंधूंना जरूर असे वाटले असेल की, झालं आता! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुटण्याची जी काहीशी आशा होती ती आता संपली. सत्याग्रह झाला. आता आणखी चार-आठ महिने आत राहावे लागणार! सत्याग्रहाचा निर्णय घेणार्‍यांना कारागृहात अटकलेल्या आपल्या बंधूंच्या कारावासाचा काळ वाढेल याची जाणीव नव्हती असे नाही. पण शेवटी ज्यांच्यावर दायित्व असते, त्यांना काही निर्णय निष्ठुरतेने घेणे भागच असते. अहो, जो सेनापती आहे, तो युद्ध चालू असताना काही सैनिक झोपले आहेत, ते प्राणाला मुकतील असा विचार करणार असेल तर तो काय लढू शकेल? ते सैनिक लढू शकणार नाहीत. म्हणून बाहेरील बंधूंना सत्याग्रहाचा निर्णय घ्यावा लागला.

लोकशाही रक्षणासाठी सत्याग्रह

दुसरी सूचना अशी आली की, सत्याग्रह करावयाचा; पण संघावर आलेली बंदी उठावी एवढाच विचार करून सत्याग्रह करावा. दुसरा कोणताही विचार करावयाचा नाही. दुसरे कोणतेही कारण सांगायचे नाही. आता हा विचार पुढे आला असताना कशी स्थिती निर्माण झाली असेल? आपल्या विचार करण्याच्या प्रकारामध्ये ही सूचना पुष्कळ अंशी बसू शकते. कारागृहामधून बाहेर असलेल्या बंधूंमधून आणि इतरांकडून विचार आला असेल की, सत्याग्रह करावयाचा तो ‘संघाचा सत्याग्रह’ एवढाच विषय! असे असले तरी निर्णय घेताना विचार करावा लागला असेल की, देशात आणीबाणीची परिस्थिती आहे, त्यामुळे संघावर बंदी आहे. त्यानंतर एकामागून एक काळे कायदे करण्यात आले आहेत. अनेक पक्षांच्या हजारो बंधूंना पकडण्यात आले आहे. येथे लोकशाहीचा अस्त झाला आहे. तेव्हा जर केवळ संघावरची बंदी उठावी एवढेच कारण घेऊन आपण सत्याग्रह केला तर ते इष्ट होईल काय? हे चालेल काय? जनमत आपल्याबरोबर येईल काय? आपण अलग तर पडणार नाही? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यापुढे उभे राहिले असतील आणि प्रश्‍न येणे स्वाभाविक होते. निर्णय घेणे सोपे नव्हते. पण त्यांनी निर्णय घेतला. केवळ ‘संघावरील बंदी उठावी’ हा विषय डोळ्यापुढे न ठेवता, जे काही विषय होते त्या सर्व विषयांकरताच आणि आपल्या नावावर न करता लोक संघर्ष समितीच्या माध्यमांतून सत्याग्रह करावयाचा. हा कठीण निर्णय त्यांनी घेतला. आपण जो सत्याग्रह केला त्यात हे सर्व विषय आल्याने बाकीच्यांचेही सहकार्य आपणास मिळाले आणि त्याचमुळे सर्वसामान्य जनतादेखील आपल्याबरोबर उभी राहिली. त्यामुळे आज आपण पाहतो आहोत ना, की आपल्याविषयी सर्वत्र हवा कशी ओलाव्याची, सहानुभूतीची आणि खूप अपेक्षांचीही आहे. या सर्व गोष्टीचे श्रेय ज्या आपल्या बंधूंनी असा निर्णय घेतला त्यांना आहे.

कारागृहांत मला भेटायला लोक यायचे. ते मला सांगायचे, सरकारला असे वाटले की संघाचे केंद्र नागपूरला आहे, तेव्हा नागपूरला मला ठेवले तर माझे नागपूरच्या बाहेरील संबंध राहतील. म्हणून मला सरकारने येरवड्यात आणले. येरवड्यात आणले ते बरेच झाले. माझ्या प्रकृतीच्या दृष्टीने पुण्याची हवा नागपूरच्या हवेपेक्षा चांगली. परंतु मला कोठेही जरी ठेवले असते, तरी माझे बाहेरचे संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारचे राहिलेच असते. मला बाहेरून निरोप यायचे की, ‘आता काय करावयाचे? असा प्रश्‍न चर्चेला येत आहे. काय निर्णय घ्यावयाचा ते तुम्ही सांगा!’ मला जे काही योग्य वाटेल, ते मी लिहायचे, पण प्रत्येक वेळी शेवटी असे वाक्य लिहायचे की, ‘शेवटी बाहेर तुम्ही आहात, परिस्थितीचे ज्ञान तुमचे आहे. या प्रसंगी कोणता निर्णय योग्य राहील ते तुम्हीच ठरवू शकता. मी येथून ठरवू शकत नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो निर्णय मला मान्य आहे आणि ‘तो निर्णय माझा आहे, असे तुम्ही सर्वांना सांगा,’ असे मी प्रत्येक पत्रात लिहीत असे. आज सर्व परिस्थितीचा विचार केल्यानंतर, मला असे वाटते की, बाहेरच्या बंधूंनी जे सर्व प्रकारचे निर्णय घेतले ते योग्य होते आणि त्याचेच फळ म्हणून आज आम्ही अग्निदिव्यातून बाहेर पडलो आहोत.

परिस्थितीत बदल

आता आपल्यापुढे अनेक प्रश्‍न उभे आहेत. काही विषयांसंबंधी पत्रकार परिषदेतून पुष्कळ चर्चा झाल्या आहेत. त्यासंबंधी अनेकांच्या मनांत अनेक प्रश्‍न असतील. त्या प्रश्‍नासंबंधी चर्चा करण्याचे स्थान हे नाही. हे तर उघडच आहे की, 20 किंवा 22 महिन्यांपूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यांत काही ना काही बदल झाला आहेेे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. Much water has flown into the Ganges अशी इंग्रजी म्हण आहे ना? या काळात नदीमधून पुष्कळ पाणी वाहून गेलेले आहे. परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही, असे समजण्याचे काही कारण नाही. मोठेसे मूलभूत अंतर पडले नसेल. तेव्हा काही ना काही प्रश्‍न आपल्यापुढे उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काही विषयांना सार्वजनिक सभेत, प्रतिष्ठितांच्या सभेत, तर काही विषयांना पत्रपरिषदेत उत्तरे दिली आहेत. ही उत्तरे देताना कोणत्याही प्रकारे, ज्याला इंग्रजीत ommitment  म्हणतात, कोणत्याही प्रकारचे आश्‍वासन त्यांना दिलेले नाही. मी त्यांना म्हणालो आहे की, ‘‘एक महिना झाला मी बाहेर आलेलो आहे. कारागृहांत आम्ही सर्वजण एकत्र होतो ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे व्यक्तिमत्त्वासंबंधीचे, व्यवहारासंबंधीचे आणि विचारासंबंधीचे आमचे गैरसमज, अपसमज फार मोठ्या प्रमाणात गळून पडले आहेत. तेव्हा हे जे सामंजस्य निर्माण झाले आहे, ही जी एकता निर्माण झाली आहे, ते सामंजस्य- ती एकता अधिक बळकट व्हावयास पाहिजे. याची काळजी आम्ही घ्यावयाची आहे, त्यांनीही घ्यावयाची आहे. आम्ही घेऊ, ते घेतील. यातून पुढे जे काही निष्पन्न व्हायचे आहे. हा जो काही पुढे ‘डायलॉग’ होईल, जे बोलणे होईल ते दोघांशी होईल. स्वयंसेवकांशी होईल.’’

देशकल्याणास प्राधान्य

आजकाल कोणत्याही विषयांसंबंधी निर्णय घ्यावयाचा झाला तर तुम्हाला अगदी Grass-rootsपर्यंत जावे लागेल. अगदी खालच्या स्तरांपर्यंत त्या संबंधात चर्चा केली पाहिजे. सर्व स्वयंसेवकांशी चर्चा करून त्यांना त्या निर्णयाशी सहमत केले पाहिजे. मी सांगेन आणि ते ऐकतील असे होणार नाही. तेव्हा मला माझ्या ‘ग्रस-रूट्स’शी बोलावयास अवकाश मिळाला पाहिजे. तसेच त्या प्रश्‍नांचा ज्या कोणा इतरांशी संबंध पोहोचत असेल त्यांच्याशीही बोलावले पाहिजे. त्यांच्याशी ‘डायलॉग’ केला पाहिजे. आतापर्यंत आम्ही चहा पिण्यासाठी एकत्र जमलो, अशा वेळी आमच्यामध्ये औपचारिकपणे संवाद होतो. जेव्हा काही निर्णय घेण्याप्रत बोलणी येण्याची शक्यता निर्माण होईल, तेव्हाच ते निर्णय घेण्यात येतील आणि ते निर्णय देशाच्या कल्याणासाठी आवश्यक असेच असतील. कोणत्याही राजनैतिक पक्षाच्या, नेत्याच्या अगर परिस्थितीच्या दबावाखाली निर्णय घेण्यात येणार नाही. हे मी अगदी प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे. कित्येकांच्या मनात काही प्रश्‍न असतील म्हणून मी हे सांगत आहे.

प्रभावी शाखाबांधणीचे कार्य

संघाच्या लोकांचा विचार करावयाचा झाला तर, पूर्वी जसे संघाचे काम चालू होते, तसेच ते सुरू झाले आहे. ते इतक्या स्वाभाविकपणे सुरू झाले आहे की लोकांना त्याचे फार आश्‍चर्य वाटते. गेले 20-22 महिने संघावर बंदी होती की नव्हती अशी शंका यावी इतके ते सहजपणे सुरू झाले आहे. आज सर्वत्र आपल्यासंबंधी अनुकूलता आहे, उत्साह आहे, अपेक्षा आहेत आणि आमंत्रणही आहे. हिंदुस्थानात ज्या गावी किंवा ज्या जागी आपल्याला प्रवेश नाही असे कधीकधी वाटत होते. त्या सर्व ठिकाणी आता आपल्याला निमंत्रण आहे, स्वागत आहे. तेव्हा आता आपले काम असे आहे की, पहिल्यांदा आपल्या जुन्या सर्व शाखा नीट करावयाच्या, मोठ्या करावयाच्या, प्रभावी करावयाच्या. आतापर्यंत आपण संघासंबंधी बोलायचे; पण एखाद्याचे वय-स्टेटस पाहून ‘तुम्ही हाफ पँट घालून आणि दंड घेऊन संघस्थानावर यावयाला पाहिजे’ असा आग्रह करण्याचा संकोच आपल्यापैकी काहींना कधी कधी वाटायचा. ज्याला बोलायचे त्याच्या वयाचा, स्टेटस्चा आपणासच विचार पडावयाचा. पण आता हे सिद्ध झाले आहे की, आपण जे काही मिळविले आहे, जे काही प्रकट झाले आहे, त्याचे मुख्य श्रेय संघस्थानावरील एका तासाच्या कार्यक्रमाला आहे. तेव्हा निःसंकोचपणे सर्व प्रकारच्या लोकांना भेटून संघस्थानावर त्यांची उपस्थिती कशी आवश्यक आहे, हे आपल्याला त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून सांगता आले पाहिजे आणि त्या लोकांना संघस्थानावर उपस्थित करता आले पाहिजे.

समाजकार्यात योगदान

पण हे तर उघडच आहे की, सरते शेवटी संघामधील संस्कार हे विधायक आहेत आणि ते समाजास उपयोगी होतात हा इतरांना अनुभव आला पाहिजे. संघशाखे वरून आल्यानंतर आपण हाफ पँट काढून ठेवतो आणि कोपर्‍यात काठी ठेवून देतो, त्याप्रमाणे संस्कारही ठेवून दिले तर? आणि मग जो काही व्यवहार असेल- तो कोणताही असो - तो करताना संस्काराची आठवण ठेवणार नसू तर चालणार नाही. जो काही आपला व्यवसाय असेल त्यात संघाचे संस्कार प्रकट झाले पाहिजेत. तसेच आपल्या आसपास जी काही कामे चालत असतील, त्या कामांमध्ये, त्या कामाच्या आवश्यकतेप्रमाणे, आपल्या रुचीप्रमाणे व आपल्या गुणांप्रमाणे आपले पुरेसे योगदान झाले पाहिजे. असे झाले तरच संघाच्या संस्काराची क्षमता लोकांना मान्य होणार आहे. या दृष्टीने लोकांच्या अपेक्षा आता फार उंचावल्या आहेत. आता पूर्वीपेक्षा आपण अनेक क्षेत्रांमध्ये शिरलो आहोत आणि चांगल्यापैकी शिरलो आहोत. आपल्या संबंधात जे लोक आले त्यांना हे मान्य झाले आहे. आपण त्यास प्रसिद्धी दिली नाही इतकेच! केवळ शैक्षणिक क्षेत्र म्हटले तर, हजार तरी संस्था आपण चालवीत आहोत. त्यापैकी शेकडो संस्था या आणीबाणीच्या काळात सरकारने ताब्यात घेतल्या. त्या संबंधीच्या वार्ता वृत्तपत्रांतून आपण वाचल्या असतील. याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्र काय, अन्य क्षेत्रे काय, अशी अनेक क्षेत्रे राहणार आहेत. त्यामध्ये व्यक्तिशः एखाद्या स्वयंसेवकाने किंवा चार स्वयंसेवक मिळून आणि शक्य असेल तर इतर आपल्याशी सहमत असलेल्या अनेक बंधूंचा सहयोग घेऊन अनेक प्रकारची कामे आपणास करावी लागणार आहेत. हे दायित्व आपणास टाळता येणार नाही. केवळ संघस्थानावर उपस्थित राहून आणि संघाचा विचार करून चालणार नाही. हे उघडच आहे की, जर मी काही प्रश्‍नांची उत्तरे दिली असतील, काहींची उत्तरे पत्रपरिषदेत आली असतील, त्याची वृत्तपत्रांतून हेडलाइन म्हणा, त्याचा सारांश-गोषवारा म्हणा, बरोबरच आला आहे असे नाही. उत्तरे देताना माझ्या म्हणण्याचा अर्थ होता तो असा की, ‘या दृष्टीने आम्हाला संघाच्या कार्यक्रमांचा विचार करताना यापुढे अधिक विचार करावा लागेल.’ तेव्हा संघाच्या दृष्टीने मला एवढेच म्हणावयाचे आहे.

राजकारणाच्या दृष्टीनेही मी प्रत्येक भाषणात स्पष्ट केले आहे की, 1925 सालीच डॉक्टरांनी संघाची जी भूमिका स्पष्ट केली आहे, ती भूमिका घेऊनच आम्ही चालणार आहोत.

सर्व कार्यकर्ते सारखेच

मला खात्री आहे की आपले सर्व संघबंधू नीटपणे आपल्या कामाला लागतील. शक्यता अशी आहे की, या काळात काही बंधूंनी त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या असतील त्या पूर्ण केल्या असतील. काही बंधूंनी त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या काही कारणास्तव तेवढ्या अंशी पूर्ण झाल्या नसतील. पण यासंबंधी कोणी काही विशेष मनाला लावून घेण्याचे कारण नाही. याचे कारण असे की, संघाला सर्व प्रकारचे कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे. येरवडा कारागृहामध्ये निरनिराळ्या विचारांचे अनेक लोक होते. त्यांचा आपल्या सर्व प्रकारच्या संघबंधूंशी संबंध यायचा. अनेक प्रकारची चर्चा होत असे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असे अनेक प्रश्‍न चर्चेत निघत, त्या चर्चांमध्ये काही संघबंधू भाग घेऊन संघाच्या कार्यक्रमांनी झालेल्या संस्कारांमुळे मिळालेल्या दृष्टिकोनातून नीट विचार मांडत. परंतु असा विषय मांडण्याची क्षमता सगळ्यांत नव्हती. तेव्हा मला एखाद दुसर्‍या पक्षाचा कार्यकर्ता म्हणायचा, तुमच्या अशा कार्यकर्त्याची भेट झाली आणि मला तो सामान्य वाटला मी त्याला उत्तर देत असे की, ‘‘तुम्हाला तो सामान्य वाटला, ठीक आहे! पण आमच्या दृष्टीने त्याचे तेवढेच महत्त्व आहे की, जो एक तासभर संघाविषयी चांगले विचार मांडतो.’’ मी असे का म्हणतो हे त्याला समजायचे नाही. मग मी त्याला सांगायचो की, ‘‘आमची कार्यपद्धती अशी काही विशिष्ट आहे की, ज्याप्रमाणे एखादा कार्यकर्ता संघाचा दृष्टिकोन नीट मांडू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा संघस्थानावर संघाचे कार्यक्रम एक तासभर उत्तम घेणारा असतो. ‘दक्ष-आरम-प्रचल,’ तसेच शिशूंचे आणि तरुणांचे खेळ घेतो तोही कार्यकर्ता आमच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे की, जो एक तास संघाचा फर्डा बौद्धिक वर्ग घेऊ शकतो. त्या दोघांमध्ये काहीही फरक नाही आणि त्या दोघांचेही उििींीळर्लीींळिि सारखेच आहे.’’

लहानपणी शाळेत असता मी एक इंग्रजी कविता वाचली होती त्याची आठवण झाली. तिचे नाव होते ‘पहाड आणि खार’. त्या कवितेचा सारांश असा होता की, ‘‘पहाड आणि खार यांचे एकदा आपापसात भांडण झाले. पहाड खारीची नेहमी चेष्टा करायचा, ‘मी किती उंच, किती भव्य, किती सुंदर. माझ्या पाठीवर कसे सुंदर वृक्ष आहेत, जंगले आहेत. आणि तू पाहा. यःकश्‍चित्!’ खारीने काही वेळ ऐकून घेतले आणि शेवटी तिने उत्तर दिले की, तुझे म्हणणे ठीक आहे.

I cannot carry forests on my back

Neither can you break a nut

मी माझ्या पाठीवर जंगले वाहू शकत नाही पण तू सुपारी किंवा लहान फळे फोडू शकतोस काय?’’ हे फार चांगले उत्तर आहे. संघामध्ये काही लोक चांगले, उत्तम, फर्डे बौद्धिक वर्ग-चर्चा घेऊ शकतील धरून चालू. पण त्यांना जर सांगितले की 10-12 लहान स्वयंसेवकांची मने तयार करा, शिशूंशी जरा चांगले वागा, एक तासभर उत्तम कार्यक्रम घ्या, संघस्थानावर आनंद राहील, उत्साह राहील असे कार्यक्रम घ्या, तर ते शक्य होईल काय? शक्य होणार नाही. मग संघ कसा चालेल? नाही चालणार. तेंव्हा संघामध्ये सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्यामुळेच संघ आजच्या स्थितीत आला आहे. पुढेही आपल्याला ही गोष्ट सतत लक्षात ठेवावयाची आहे. सर्वांकडून अशीच अपेक्षा आहे. यापुढे आपल्यावर जी जबाबदारी येणार आहे, ती आपण समर्थपणे पार पाडाल असा विश्‍वास मी प्रकट करतो.