बाळासाहेबांचे कारागृहातील दर्शन

दि. ४ जुलै १९७५ ला रात्री एक वाजता येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे प्रचंड दरवाजाचे छोटे दिंडीदार माझ्यासाठी उघडले गेले. बरोबर पुणे जिल्हा संघचालक डॉ. केळकर होते, संस्कृतपंडित, एकतेचे संपादक डॉ. वसंतराव राहूरकर होते. जेलयात्रा सुरू झाली होती. आम्ही गेलो तेव्हा सारा तुरुंग झोपला होता. सकाळी पोलिसाने खोलीचे कुलूप काढले. अंधेरी यार्डच्या ओसरीवरून मी इकडे तिकडे पाहिले आणि काय आश्‍चर्य! अंधेरी यार्डमधल्याच एका खोलीतून रा.स्व.संघाचे सरसंचालक बाळासाहेब देवरस बाहेर आलेले मी पाहिले. मी झटकन पुढे गेलो. बाळासाहेबांना वाकून नमस्कार केला. स्वत:चा परिचय करून दिला. पुण्याहून आणखी कोण कोण आलंय, काही त्रास झाला नाही ना, अशी त्यांनी चौकशी केली. पाठीवर हात ठेवून म्हणाले, ‘काळजी करायची नाही.’

मातृस्पर्श

बाळासाहेबांचा हा स्पर्श. हा ‘टच’ आईच्या मायेची नजर! एका वाघाला हत्तीचं बळ देऊन गेली.

मला राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या अशोक डांगे लिखित ‘टच’ या पुस्तकाची आठवण झाली. नंतर मी ते तुरुंगात घरून मागवून घेतले. ‘टच’ या चित्रपटाचा परिचय करून देताना अशोकभाई लिहितात ‘‘...टच हा अगदी सरळ साधा इंग्रजी शब्द, त्याचा अर्थ तर त्याहून सरळ - स्पर्श. पण संगमार बर्गमनसारखा प्रतिभावान दिग्दर्शक जेव्हा तो शब्द शब्दकोशातून उचलतो तेव्हा त्याचा अर्थ पार बदलून जातो. स्पर्श प्रत्यक्ष असतो तसाच अप्रत्यक्षही असू शकतो. तो पाशवी असतो तितकाच हळुवारही असतो. स्पर्श वैयक्तिक जीवन सजवतो तसाच सार्वत्रिकही जीवन फुलवू शकतो. तो सामान्य असतो तितकाच असामान्यही असू शकतो. पार्थिवाइतकाच अपार्थिवही असू शकतो. अपार्थिव स्पर्श आत्म्याशी जवळीक साधतो. म्हणूनच त्याच्या जाणिवा सार्वत्रिक असतात, बुद्ध, ख्रिस्त यांचा स्पर्श असामान्य व्यक्तिमत्त्वाचा ठरतो. नियतीचा स्पर्शही अटळ असाच असतो....’’

बाळासाहेब देवरसांचा स्पर्श मला असा जाणवला. मी माझ्या रोजनिशीत लिहिले की, ‘बाळासाहेबांच्या रूपाने आज मला डॉ. हेडगेवारांचा स्पर्श झाला.’ ‘तुम्हाला डॉ. हेडगेवार पाहायचे आहेत ना मग बाळासाहेब देवरसांकडे पहा’ असे बाळासाहेबांचा परिचय करून देताना श्रीगुरुजी नेहमी म्हणत. येरवडा तुरुंगात 22 महिने आम्ही सार्‍यांनी हा अनुभव घेतला.

श्रीराम दर्शन

येरवडा तुरुंगात रामनवमीच्या दिवशी सोलापूरच्या भालवणकर वकील यांचा गीतगायनाचा कार्यक्रम आम्ही अंधेरी यार्डपुरता ठेवला होता. सारवलेल्या अंगणात सतरंज्या टाकल्या होत्या. गळा गायलेला होता. ‘सेतू बांधारे’ हे आम्हा सर्वांचं आवडतं गाणं. ‘सियावर रामचंद्रकी’ अशी ओळ आली की सगळेजण ‘जय’ म्हणून ओरडत आणि ते नावाडी गीत

नकोस नौके परत फिरू ग ।

नकोस गंगे ऊर भरू

श्रीरामाचे नाम गात या ।

श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागिरथी जयजयराम दाशरथी आम्ही सारे अशा थाटात गीत म्हणत असू की, जणू काही आम्हीच रामाला पार करायला गोदावरीतून जात असू.

एकदा भालवणकर मधेच अडला. त्याला ओळ सुचेना आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांनी ती ओळ त्याला चटकन सांगितली आणि आम्हा सार्‍यांना सुखद धक्का बसला.

नंतर गीत रामायणावर गप्पा झाल्या. बाळासाहेब म्हणाले, ‘गीते कानाला गोड लागतात. सरस आहेत तरीही यातील राम रडका वाटतो. विश्‍वामित्राबरोबर राक्षसाचा संहार करणारे धनुर्धारी रामलक्ष्मण आणि अधर्म आचरणार्‍या बलाढ्य रावणवध करणारा राम यात दिसत नाही.

साध्या बोलण्यातूनसुद्धा ‘रडेपणा, जमेचिना, घडेचिना, बनेचिना’ हे पालूपद आता उघडून टाकून ‘विजयाचे वारस आम्ही’ अशा निर्धाराने झेप घेतली पाहिजे असे ते सांगत. आवेशयुक्त बोलणे असले की बाळासाहेबांचा आवाज चढत असे. त्यात दिसून येई जिद्द व आत्मविश्‍वास.

प्रतिकूलतेचा अभ्यास

बाळासाहेबांच्या खोलीत ‘नॅशनल जिऑग्रफी’ चे खूप अंक असत. त्यातील तुम्ही कोणता भाग वाचता असा प्रश्‍न एकदा मी त्यांना विचारला. कॉलेजमध्ये माझा भूगोल विषय असल्यामुळे मला उत्सुकता होती. ‘‘या जागतिक लोकप्रिय मासिकात विविध खंडातल्या आदिवासींची माहिती येते. प्रतिकूल परिस्थितीत जीवनसंघर्ष करणार्‍या जातीजमातींची माहिती असते. ती मी वाचतो. त्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर हे लोक मात करतात हे पाहणे मोठे उद्बोधक असतं.’’ बाळासाहेबांचे हे स्पष्टीकरण कितीतरी गोष्टी सांगून गेले.

येरवडा कारागृहात संघाच्या वतीने वर्षप्रतिपदेचा उत्सव साजरा झाला. अध्यक्ष होते संघटना काँग्रेसचे प्रभाकर गुप्ते. पाडव्याच्या या शुभदिवशीच डॉ. केशव बळीराम हेडगेवारांचा जन्म झाला. साहजिकच बाळासाहेबांच्या बोलण्यात डॉक्टरांच्या जीवनातील आठवणी होत्या. नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या आठवणी सांगाव्यात, विवेकानंदांच्या मुखातून रामकृष्ण ऐकायला मिळावेत तसा तो योग होता. अपूर्व! ज्यांनी तो अनुभवला ते धन्य होत. बाळासाहेब सांगत होते, ‘काही जणांची अशी समजूत आहे की संघ हा सुखवस्तू लोकांचा आहे. पोटातलं पाणी न हलता जेवढे देशकार्य करता येईल तेवढे कार्य करावं. संघाच्या लोकांना गरिबीची काय कल्पना, दारिद्य्र त्यांना कुठलं ठाऊक? असं म्हणणार्‍या लोकांसाठी सांगतो की, समोर बसलेल्यांमध्ये जो गरीब असेल तोही डॉक्टर हेडगेवारांपुढे श्रीमंत ठरेल असे दारिद्य्र डॉक्टर हेडगेवारांनी भोगलंय. संघ कार्यासाठी तिसर्‍या वर्गातून प्रवास करताना प्लॅटफॉर्मवर एका द्रोणात भाजी व दुसर्‍या हातात रोटी घेऊन खाताना ते आम्हाला दिसत. दारिद्य्र म्हणजे काय, उपास घडतो म्हणजे काय होते या सार्‍या वेदना या संघ निर्मात्याने प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत.

दमाची लढाई

येरवडा तुरुंगात रा.स्व.संघाव्यतिरिक्त अन्य पक्षांचे सर्व थोर पुढारी तुरुंगात होते. ग.प.प्रधान, भाई वैद्य, प्रा.वर्दे, राजहंस, दि.बा.पाटील, शिरुभाऊ लिमये, भाई गरुड, रामभाऊ म्हाळगी, बागाईतकर, मुंबईचे नेते, एक ना दोन काही ना काही निमित्ताने ही मंडळी अंधेरी यार्डमधील बाळासाहेबांच्या खोलीवर येत. अन्य कार्यक्रमातही गाठीभेटी होत. सर्वजण बाळासाहेबांना एक प्रश्न विचारीत, आणीबाणीचे हे संकट दूर कसे होणार? यातून पुढे काय निष्पन्न होणार? सर्वांना बाळासाहेब सांगत, ‘ही दमाची लढाई आहे. हिमतीने लढले पाहिजे.’

सत्याग्रह सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू झाली आणि ऐन दिवाळीच्या सणात घरोघरी अपरात्री जाऊन माणसं पकडली गेली आणि येरवडा जेलवर ‘हाऊसफुल्ल’ असा बोर्ड लागला. मग पकडलेली मंडळी नाशिककडे पाठविण्यात येऊ लागली. येरवड्यात सर्व मिळून जवळजवळ ५०० राजकीय कैदी होते आणि मग कारागृहात तारा येऊ लागल्या. डॉ. केळकर यांचे वडील वारले, चाळीसगावचे प्रख्यात वकील अप्पासाहेब चितळे यांचे बंधू वारले. कुणाची मुलगी सिरियस, तर कुणाला अपघात झालेला. एके दिवशी शैलम बाशेट्टी बाळासाहेबांना एकटा खिन्न बसलेला दिसला. ‘काय झालंय बाशेट्टीला. कोणी आजारी आहे का?’ बाळासाहेबांनी विचारलं. मी म्हटलं, ‘तुरुंगात भेटायला त्याच्या घरची माणसं, बहीण आली होती. तुरुंगाधिकार्‍यांनी भेटू दिलं नाही. तेव्हापासून तो उदास झालाय.’

जा त्याला मी बोलावलंय म्हणून सांग.

शेट्टीची बाळासाहेबांवर आत्यंतिक निष्ठा. तो बाळासाहेबांपाशी आला.

प्रत्येक स्वयंसेवकाकडे लक्ष

‘‘हे बघ शैलम असा उदास होऊन कसं चालेल? माझ्याकडे बघ मला कोण भेटायला येतं? तू तर मोठा हिमतीचा माणूस’’ आणि शैलम सावरला. हाच शैलम पुढे जेव्हा बाळासाहेब ससूनमध्ये ट्रीटमेंटसाठी जात तेव्हा सावलीसारखा त्यांच्या मागे राही.

ससूनमधल्या हलगर्जीपणामुळे येरवडा तुरुंगातले संघाचे कार्यकर्ते डॉ. गुळवणी यांचे निधन झाले. संघाचे फार मोठे तोलामोलाचे प्रचारक, उत्कृष्ट संघटक. गोपाळराव देशपांडे यांचे पॅरोलवर असताना निधन झाले तेव्हा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसह सारा तुरुंग रडला आणि एके दिवशी अंगावर वीज कोसळावी तशी बातमी आली. ठाण्याच्या तुरुंगात संघाच्या नागपूर केंद्र कार्यालयाचे प्रमुख पांडुरंगपंत क्षीरसागर यांचे निधन झाले. ठाणे तुरुंगातून त्यांची बाळासाहेबांना पत्र येत.

ते गेल्याची बातमी आली तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ‘‘तुम्हाला कल्पना नाही. फार मोठा माणूस होता. आता पुन्हा नागपुरास मी जाईन तेव्हा मला पांडुरंगपंत क्षीरसागर भेटणार नाहीत.’’

लोकशाहीच्या या लढ्यात एकेक सिंह जात होता. यशाचा गड मिळविण्यासाठी.

आणि 1977 सालचा पाडवा उजाडला. त्या दिवशी संध्याकाळपासून निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली. ठिकठिकाणी तुरुंगात रेडिओभोवती, ट्रान्झिस्टरभोवती स्वयंसेवकांचे घोळके तासन्तास बसले होते. जनता पक्षाची घोडदौड चालू होती. रात्रौ दीडला तुरुंगात बाहेरून चिठ्ठी आली. ‘इंदिरा आणि संजय यांचा पराभव झाला’ खाली ‘ताई’ अशी सही होती. मुंबईच्या सर्व जागा जनता पक्षाने जिंकल्या. मिसा या काळ्या कायद्याचे जनक हरिभाऊ गोखले निवडणुकीत उताणे पडले. जेलमध्येच उत्स्फूर्त विजयी मोर्चा निघाला. आम्ही सारेजण आनंदाने बेहोश झालो होतो. आमचा विजयी मोर्चा अंधेरी यार्डमध्ये बाळासाहेबांच्या खोलीवर आला. आनंदाने बाळासाहेब म्हणाले, ‘हा जनतेचा विजय आहे.’

पहाटे बातमी आली आणीबाणी उठली. सकाळी तोरसकर साहेब, कुलकर्णी साहेब बाळासाहेब देवरसांना पुष्पगुच्छ घेऊन भेटायला आले. म्हणाले, ‘आपणा सर्वांना सोडण्याचे आदेश आले आहेत.’

तुरुंगाबाहेर हजारो लोक स्वागतासाठी उभे होते. सार्‍यांना पंचारतीने ओवाळले जात होते. गुलालाने माखले जात होते. ट्रक भरभरून गावातून माणसे येत होती. गळ्यात फुलांचे हार पडत होते. तोंड गोड केले जात होते.

आजही हे सारं लिहिताना अंगावर आनंदाचे रोमांच येतात. येरवडा कारागृहात सरसंचालक बाळासाहेब देवरसांच्या सहवासात राहायला मिळाले हे केवढे भाग्य.

किती आठवणी सांगाव्यात. बाळासाहेबांना स्वच्छतेची फार आवड. रोज सकाळी दाढी व्हायचीच. कपडे एक पायजमा व नेहरू सदरा. साधेच पण पांढरेशुभ्र! पथ्य अतिशय कडकपणे पाळत. व्यायामात व फिरण्यात कधी खंड नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इतर आदर्श पुढार्‍यांप्रमाणे ते आमच्यात फक्त एक-दोन पावलंच पुढे असत. कधी ते आम्हाला चूल पेटवायला मदत करीत, तर कधी विनोदी गोष्टी सांगून हसवीत. तरुण कार्यकर्त्यांवर सुधीर जोगळेकर, धरम चोराडिया, प्रकाश जावडेकर, मदन मिश्रा, नंदू फडके, भिकू इदाते यांच्यावर त्यांचा अधिक लोभ असे. बोलण्याच्या ओघात असंख्य मानवी स्वभावाचे नमुने ते सांगत. कारागृहातील वृद्धबंधूंची ते जातीने काळजी घेत. कोणी आजारी असेल तर स्वत: जातीने भेटत. एकदा कोणीतरी लाडात येऊन कुमार सप्तर्षी व देशपांडे यांच्या तंट्याचे वर्णन बाळासाहेबांना सांगू लागले तर त्याला तेथेच थांबवून ते म्हणाले, ‘मला असल्या गोष्टीत रुची नाही.’ बाबाराव भिडे, रामभाऊ म्हाळगी, श्रीपती शास्त्री, वसंतराव भिडे, अप्पा सोहोनी, मोहनराव गवंडी इत्यादींबरोबर त्यांची महत्त्वाची बोलणी होत, पण त्याची वाच्यता कुठे होत नसे. सार्‍यांना वाटे बाळासाहेबांचा आपल्यावर जास्त लोभ आहे बरं का. त्यांच्या रूपाने आम्ही डॉ. हेडगेवार यांना पाहत होतो.

माझ्या तुरुंगाच्या डायरीत सार्‍याचं टाचण आहे. शेवटच्या पानावर मी लिहिलं आहे

नेता ऐसा मिळे आम्हाला

काय असे मग उणे?

यशाने दुमदुमवू त्रिभुवने