देवरस यार्ड

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली ‘आणीबाणी’ घोषित केली. सुमारे 19-20 महिने संपूर्ण देशात लोकशाहीविरोधात अनेक अप्रिय घटना घडल्या. सर्व विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना ‘मिसा’ कायद्याखाली स्थानबद्ध करून तुरुंगात डांबण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्यात आली व संघाचे अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनाही तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या काळी राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उपाख्य, बाळासाहेब देवरस यांनाही अटक करून पुणे येथील सुप्रसिद्ध अशा ‘येरवडा जेल’ मध्ये ठेवण्यात आले होते. सुमारे 18-19 महिने बाळासाहेब देवरस सरकारी अवकृपेमुळे कारागृहात होते. त्यांच्यासह अनेक राजकीय नेते, संघाचे अन्य अधिकारीदेखील त्याच कारागृहात स्थानबद्ध होते. हजारो कार्यकर्त्यांनी ती बंदीशाळा बहरून गेली होती. बाळासाहेबांना एका दोन खोल्यांच्या स्वतंत्र यार्डात ठेवण्यात आले होते. ती सर्व जागा आता ‘देवरस यार्ड’ नावाने राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित करण्यात आली आहे. पुणे शहराचे माजी संसद सदस्य, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ल.सो. तथा अण्णा जोशी यांनी नेटाने सरकारकडे पाठपुरावा करून ‘देवरस यार्ड’ संरक्षित राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी खूप प्रयत्न केले व त्यांच्या खासदारकीच्या कालखंडातच त्यास मंजुरी मिळविली. ‘येरवडा जेल’मध्ये टिळक यार्ड, गांधी यार्ड व देवरस यार्ड अशी तीन राष्ट्रपुरुषांची स्मारके आहेत. प्रवेशद्वारातच काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट स्तंभावर बाळासाहेबांच्या संबंधातली माहिती सोनेरी अक्षरांमध्ये कोरलेली आहे व त्यात त्यांचे येथे असलेल्या वास्तव्यासंबंधी शिलालेख आहे.  प्रत्यक्ष ज्या खोलीत बाळासाहेबांचा निवास होता, त्या खोलीत त्यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले. करारी मुद्रा असलेले व आत्मविश्‍वासपूर्वक पाऊले टाकीत पुढे पुढे जाणारे ते चित्र, ती प्रतिमा हजारो स्वयंसेवकांचे स्फूर्तिस्थान झाले आहे. प्रत्येकाला अत्यंत प्रेरणादायी अशा या स्मारकाची मूळ कल्पना बाळासाहेबांचे अनेक वर्षे स्वीय सचिव राहिलेल्या श्रीकांतजी जोशींची आहे व तिला मूर्तरूप माजी खासदार अण्णा जोशी, पुण्यातले ज्येष्ठ आर्किटेक्ट शरदभाऊ साठे यांनी दिले आहे. येरवडा भागातील स्वयंसेवक कार्यकर्ते दरवर्षी त्या स्मारकात पुण्यतिथी व जयंतीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्या तैलचित्राचे पूजन-पुष्पहार समर्पण करण्यासाठी दरवर्षी शेकडो स्वयंसेवक, ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित असतात. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

- प्रदीप नाईक