दामुअण्णा दाते

राष्ट्रजीवनात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वात मोठी संघटना म्हणून देशाच्या केंद्रस्थानी निर्णायक स्वरूपात उभी आहे. हजारो गावांमध्ये, सर्व जातीजमातींमध्ये पसरलेले हे महान सामर्थ्यशाली संघटन आहे. समाजजीवनातील असे एकही क्षेत्र नाही की, जेथे संघाचे वर्चस्व नाही. संघाचे कार्य जेव्हा सुरू झाले, तेव्हा इतरही अनेक संस्था-संघटना-दले अस्तित्वात होती. त्यापैकी कित्येकांना शासनाचे, वृत्तपत्रांचे, अन्य प्रसारमाध्यमांचे समर्थन-संरक्षण होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेल्या नेत्यांचे वलयांकित नेतृत्व त्यांच्यामागे उभे होते, तरी आज त्या संस्था-संघटना नामशेष झालेल्या दिसतात. याउलट संघाला असे कोणतेही पाठबळ नव्हते. इतकेच काय, सरकारकडून आणि समाजातील अन्य नेत्यांकडून संघ नष्ट करण्याचे सर्व इष्टानिष्ट प्रयत्न होत होते. तरीही संघ सतत वाढतच राहिला. याचे कारण पाहता दोन मुद्दे पुढे येतात. एक म्हणजे संघाचे उदात्त तत्त्वज्ञान. संघाची विचारसरणी संकुचित, प्रादेशिक, प्रतिगामी असल्याचा फार मोठा अपप्रचार करण्यात आला, परंतु ते जर खरे असते तर एवढे मोठे देशव्यापी संघटन उभे राहू शकले नसते. वास्तविकता अशी आहे की, मातृभूमी वैभवसंपन्न करण्याचे एक महान तत्त्वज्ञान घेऊन संघ उभा राहिला. त्यामुळेच लक्षावधी उच्चशिक्षित तरुण त्यासाठी अवघे जीवन ओवाळून टाकण्यासाठी सिद्ध झाले, परंतु केवळ उदात्त तत्त्वज्ञान असून भागत नाही. ते तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात साकार करणारे, समर्पित जीवनाचा आदर्श घालून देणारे कार्यकर्तेही लागतात. संघाने आपल्या अलौकिक कार्यपद्धतीतून असे असंख्य कार्यकर्ते देशाच्या कानाकोपर्‍यात उभे केले. या कार्यकर्त्यांनी रक्त आटवून, घाम गाळून संघाची उभारणी केली. अशा महान कार्यकर्त्यांपैकीच एक म्हणजे आपले दामुअण्णा दाते.

सुळावरची पोळी

दामुअण्णांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अलिबागजवळील थळ या छोट्या गावातील हे कुटुंब. त्यांच्या वडिलांची सोलापूर येथे बदली झाली त्यामुळे दामुअण्णांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी अभियांत्रिकीतील उच्च शिक्षण मुंबईत घेतले आणि काही काळ नोकरी केल्यावर संघाचे प्रचारक म्हणून ते बाहेर पडले. सुरुवातीला मुंबईत परळ भागात आणि त्यानंतर बरीच वर्षे नगर जिल्ह्यात प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यानंतर पुणे विभाग प्रचारक, महाराष्ट्र सह-प्रांतप्रचारक, क्षेत्रीय कार्यकारिणीचे सदस्य अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या.

1950 नंतरचा काही वर्षांचा काळ हा संघाच्या दृष्टीने अग्निपरीक्षेचा काळ होता. संघावर गांधी हत्येचा अत्यंत घृणास्पद आरोप लादण्यात आला होता. सरकार, प्रसारमाध्यमे आणि इतर सत्ताकेंद्रांनी संघाला अस्पृश्य ठरवून अपप्रचाराची राळ उठवली होती. महाराष्ट्रात तर संघाच्या विरोधात अत्यंत जहरी प्रचार करण्यात आला होता. अशा काळात संघाचे कार्य करणे ही सुळावरची पोळी होती. प्रखर विरोधाला तोंड देऊन काम करावे लागत होते. संघबंदीच्या काळात असंख्य स्वयंसेवकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती, परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता ज्यांनी धैर्याने कार्य केले अशा प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये दामुअण्णांचा समावेश होता. त्यांनी खेडोपाडी अहोरात्र प्रवास करून, एकेका व्यक्तीशी संपर्क साधत त्यांना संघकार्याशी जोडून घेतले. लहानमोठे, सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत अशा सर्व प्रकारच्या स्तरांवर त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने दामुअण्णा हे एक परम विश्‍वासाचे, आपले मन खुले करण्याचे, आपुलकीचे स्थान होते. शेकडो-हजारो वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या स्वयंसेवकांना एकत्र गुंफण्यासाठी, एका ध्येयवादासाठी कार्यप्रवण करण्याकरता जो स्नेहपूर्ण, सर्वसमावेशक स्वभाव लागतो, त्याचा आदर्श दामुअण्णांनी निर्माण केला होता.

परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जादू केवळ स्वयंसेवकांपुरतीच मर्यादित नव्हती. प्रत्येक स्वयंसेवकाच्या कुटुंबातही त्यांनी आदराचे, मायेचे स्थान मिळवले होते. अशी शेकडो कुटुंबे त्यांनी आपलीशी केली होती आणि त्यातील प्रत्येक लहान-मोठ्या स्त्री-पुरुषाला, मुलांना, वयस्कर माणसांना दामुअण्णा हे आपलेही जवळचे आप्त आहेत, असे वाटत असे. हे वैशिष्ट्य केवळ दामुअण्णांचेच होते असे नाही. संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा तो विलोभनीय स्वभावविशेष होता. दामुअण्णाही अशा कार्यकर्त्यांच्या प्रभावळीत उठून दिसत.

संघाला बदनाम करण्यासाठी गांधीहत्येच्या आरोपाबरोबरच संघ ही शहरी संघटना आहे, ग्रमीण भागात तिला काहीही स्थान नाही, संघ ही केवळ ब्राह्मणांची संघटना आहे, असे आरोपही करण्यात येत होते. महाराष्ट्रातील ‘पुरोगामी’ मंडळींचा या अपप्रचारात पुढाकार होता. त्याला संघ कार्यकर्त्यांनी, भाषणे करून किंवा पत्रके काढून नव्हे, तर प्रत्यक्ष संघटना उभी करून चोख उत्तर दिले. या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमधूनच महाराष्ट्रात शेकडो खेडेगावांमध्ये, सर्व जातीजमातींमध्ये संघाची उभारणी झाली. संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये, शिबिरांमध्ये, संघ शिक्षा वर्गांमध्ये या अभिमानास्पद वास्तवाचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसून येते. दामुअण्णांचे यादृष्टीने मोठे मोलाचे योगदान होते. महाराष्ट्रात ‘सामाजिक समरसता मंचा’ची स्थापना आणि विकास करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. आरक्षणाचा मुद्दा असो, मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा वाद असो, महात्मा फुले किंवा राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याची बाब असो, प्रत्येक वेळी दामुअण्णांनी स्वयंसेवकांचे उद्बोधन करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. हिंदू समाजातील विषमता, जातिभेद दूर करण्याच्या दृष्टीने समाजात अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी ते झटत राहिले. ‘भटके-विमुक्त विकास परिषदे’च्या माध्यमातून जी विधायक कामे सुरू झाली त्यासाठी मनुष्यबळ, पैसा आणि इतर साहाय्य करण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यासाठी प्रकृती अस्वास्थ्याची तमा न बाळगता ते श्रमत राहिले. एकदा ‘अ.भा. प्रतिनिधी सभे’च्या बैठकीत समरसतेचा विषय मांडण्याची जबाबदारी दामुअण्णांवर सोपवण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयारी करून जी मांडणी केली, ती दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहिली.

सर्वत्र संचार

साहित्य, संगीत, नाटक, राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये दामुअण्णांचा अप्रतिहत संचार आणि संपर्क होता. सर्व प्रकारच्या आधुनिक साहित्याचा आणि कला व्यवहारांचा त्यांचा अभ्यास होता. याबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये कर्तबगारी गाजवणार्‍या स्वयंसेवकांबद्दल त्यांना अत्यंत तीव्र आणि सार्थ असा अभिमान होता आणि तो ते आग्रहपूर्वक व्यक्त करत असत. मग ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असोत, संगीतकार सुधीर फडके असोत, साहित्यिक गो.नी. दांडेकर असोत की, राजकीय मुत्सद्दी प्रमोद महाजन अथवा गोपीनाथ मुंडे असोत, या सर्वांची ते मुक्तकंठाने प्रशंसा करत असत.

दामुअण्णांचे बौद्धिकवर्ग ही एक उत्कृष्ट बौद्धिक मेजवानी असे. प्रत्येक बौद्धिकवर्गासाठी ते झटून तयारी करत आणि अत्याधुनिक संदर्भ-उदाहरणांनी आपले बोलणे खुलवत असत. त्यांच्या व्याख्यानांमध्ये अनेक उत्कृष्ट कथा-कविता, किस्से, म्हणी यांचा अत्यंत आकर्षकपणे वापर केलेला असे. बौद्धिकवर्गाच्या तयारीसाठी ते टिपणे काढत. या टिपणांना चिठ्ठी क्र. 1, चिठ्ठी क्र.2 असे क्रमांक दिलेले असत.

आणीबाणीच्या काळात दामुअण्णांनी भूमिगत राहून संघर्ष संघटित करण्याचे कार्य केले. शेकडो स्वयंसेवकांना त्यांनी सत्याग्रहासाठी प्रेरणा दिली. जे तुरुंगात गेले त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क ठेवला. त्यांच्या आर्थिक-मानसिक अडचणी दूर करण्यासाठी ते राबत होते. हे सर्व करूनही ते प्रसिद्धीपासून दूर राहिले.

अनुकूल व्यवहार

सर्वसामान्य समाज परंपराप्रिय, रुढीशरण असतो हे सामाजिक वास्तव दामुअण्णा पुरेपूर ओळखून होते, परंतु त्यातून समाजाला बाहेर काढून सुधारणेच्या वाटेवर लावण्याचे कार्य हळुवारपणे केले पाहिजे, याचे त्यांना भान होते. त्यामुळेच स्वत:च्या कुटुंबातही त्यांनी हीच दृष्टी ठेवून अत्यंत आत्मीयतेने सर्व जबाबदार्‍या सांभाळल्या होत्या. त्यांच्या दोन धाकट्या बंधूंचे ऐन तरुणपणात निधन झाले तेव्हा आपल्या भावजयींना, पुतणे-पुतण्यांना त्यांनी सर्व प्रकारचा धीर दिला, मदत केली. दोन्ही भावजयींना ऐन तरुणपणात वैधव्य आले होते. दामुअण्णांनी घरच्या इस्टेटीतील त्यांचा वाटा त्यांना मिळेल याची काळजी घेतली. इतकेच नव्हे, तर त्यांचे पुनर्विवाहही आग्रहपूर्वक जमवून दिले. आपले पुतणे-भाचे यांच्या आंतरजातीय विवाहांनाही त्यांनी आनंदाने प्रोत्साहन दिले. त्यांच्या अडीअडचणींमध्ये मदत केली आणि एक आदर्श कुटुंबप्रमुख म्हणून विविध जबाबदार्‍या पार पाडल्या. सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने अनुकूल असा व्यवहार कोणतीही कटुता निर्माण होऊ न देता त्यांनी घडवून दाखवला.

दामुअण्णांचे व्यक्तिमत्त्व अतिशय नीटनेटके, प्रसन्न होते. साधेच परंतु स्वच्छ कपडे, हसतमुख चेहरा, विनोदाचा शिडकावा असलेले चटकदार संभाषणपटुत्व यामुळे ते अल्पावधीत समोरच्या माणसाचे मन जिंकून घेत असत. लहान मुले, वृद्ध, महिला, शेतकरी, पत्रकार, राजकीय नेते, विद्वान, साधुसंत अशा विविध प्रकारच्या व्यक्तींशी ते सहज सूर जमवू शकत असत. याबरोबरच संघाच्या प्रचारकाने, लहानमोठ्या कार्यकर्त्याने आपला बारीकसारीक व्यवहार कसा ठेवावा, याबद्दल ते अत्यंत जागरूक आणि आग्रही असत आणि संघाच्या दृष्टीने हानीकारक, घातक अशी गोष्ट होऊ नये यासाठी सावधपणे लक्ष ठेवून असत. या अर्थाने ते संघाचे फार दक्ष असे हितरक्षक होते. या भूमिकेतूनच त्यांनी अनेक वर्षे संघगंगा निर्दोष ठेवण्यासाठी काळजी घेतली.

अशा या महान कार्यकर्त्याच्या निधनाने संघाचे तर अपरमित नुकसान झाले आहेच, परंतु एकंदर सार्वजनिक जीवनाचीही फार मोठी हानी झाली आहे. अर्थात ते शरीराने आपल्यात नसले, तरी त्यांच्या सहवासातून, व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेतलेले असंख्य कार्यकर्ते कार्यमग्न आहेत, त्यांच्या  रूपाने  दामुअण्णांचे अस्तित्वही चिरकाल राहणार आहे.

- प्रा. सुशीलाताई आठवले 

शब्दांकन : भालचंद्र जोशी