आणीबाणी 1975 - अनिरुद्ध खोले

पुणे लष्कर भागात संघ शाखा सुरू होऊन 40 वर्षे झाली होती. संघाचे वर्षभरातील उत्सव मोठ्या संख्येने साजरे होत. लष्कर भागात अहिंदू समाज मोठया प्रमाणात असल्यामुळे संघ शाखेचे विशेष महत्व होते. तशातच संघ बंदी आल्यामुळे आम्ही कार्यकर्ते अस्वस्थ झालो होतो. देशभरात होत असलेली धरपकड मनाचा थरकाप उडवून देत असे. कोणाला कधी तुरुंगात डांबले जाईल याची शाश्वती नव्हती. नुसता संशय जरी आला तरी पोलीस पकडून नेत असत. अशातच संघ वर्तुळातून आणीबाणी विरुद्ध सत्याग्रह करायचे ठरले.

संघावर बंदी असली तरी गुप्त बैठका चालूच होत्या. त्यात कॅम्पातून (लष्कर भागासाठी जास्त प्रचलित शब्द) कोण कोण सत्याग्रह करायला तयार आहे याची चाचपणी घेऊ लागलो. जुने संघस्वयंसेवक व इतरही संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. त्यात जनसंघाचे जसे कार्यकर्ते होते तसे समाजवादी, रिपब्लिकन, दलित पँथर, शिवसेना इत्यादी पक्ष व संघटनांचे पण कार्यकर्ते होते, पण त्यातील कोणीही सत्याग्रहात सामील व्हायला तयार नव्हते. राहता राहिलो ते आम्ही दोघे मी आणि श्रीकांत लिंगायत!

पुण्यात सर्वत्र सत्याग्रह सुरू झाले होते. मोठया संख्येने स्वयंसेवक तुरुंगात जात होते. सुरवातीच्या बॅचला साडेतीन वर्षाची शिक्षा झाली होती. दोन सत्याग्रह मी स्वतः पाहून आलो होतो. एक 'एस् पी कॉलेज समोरचा (ज्यात मुलीही सामील होत्या), दुसरा अपोलो सिनेमा समोरचा! आपणही लवकरच सत्याग्रह करायचा व तुरुंगात जायचे हे मनोमन निश्चित केले होते.

आर्किटेक्चर कॉलेजचे तिसरे वर्ष म्हणजे महत्वाचे वर्ष. कॉलेजमधील इतर विद्यार्थी सबमिशनच्या तयारीला जोरदार लागले होते, तर इथे आमचे  वेगळेच उद्योग चालले होते. एके दिवशी सकाळी लवकर येऊन वॉचमनचा डोळा चुकवून सर्व वर्गात पत्रक फेकून आलो. सगळा छुपा मामला. वाडिया कॉलेजच्या मैदानावर पत्रक वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात येत असलेले मी स्वतःच्या पाहिले होते. पत्रक वाटणे, भिंतींवर आणीबाणी विरोधी घोषणा लिहिणे हे कोणाच्याही लक्षात येऊ न देता पार पाडायचे होते. रात्रीची कोणती वेळ सोयीची याचा अभ्यास केला. सिनेमा सुटतो रात्री बारा वाजता, सेकंड शिफ्टचे कामगारही त्याचवेळी घरी परतत असतात. सर्व रस्ते निर्मनुष्य व्हायला रात्रीचे दोन वाजतात. चारच्या पुढे  दुधवाले-पेपरवाले यांची वर्दळ सुरू होते हे सर्व लक्षात घेता रात्री दोन ते चार ची वेळ सोयीची असल्याचे लक्षात आले. अशा निर्मनुष्य वेळी गुपचूप जाऊन लष्कर मधील सार्वजनिक मुताऱ्या, छ.शिवाजी मार्केट अशा सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर 'आणीबाणी रद्द करा' अशी वाक्ये लिहून आलो.

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कन्या शाळेच्या भिंतीवर ऑइल पेंटने लिहिलेल्या वाक्याने मात्र धमाल उडवून दिली.

अत्यन्त वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या त्या शाळेच्या भिंतीवरील लाल रंगाने लिहिलेल्या आणीबाणी विरोधातील त्या वाक्याने शाळा व्यवस्थापन अत्यन्त अस्वस्थ झाले होते. शाळेचे अध्यक्ष संघ-परिचित असल्यामुळे. नगर कार्यवाह विजयराव कुलकर्णीना शाळेकडून प्रेमाचे(?) बोलावणे आले. ताबतोब ते वाक्य खरडवून काढण्यात यावे अशी कळकळीची विंनती करण्यात आली.दुसऱ्याच दिवशी शाळेने आपल्यावर आलेले ते संकट पुसून काढले.पुढील अनेक वर्षे ती भिंत आणीबाणीची आठवण म्हणून त्या खुणा मिरवत होती.

एकेदिवशी असाच मी रात्री दोन वाजता गल्लीतील एका स्वयंसेवकाला उठवायला म्हणून बाहेर पडलो.त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि त्याची वाट बघत उभा राहिलो.तेव्हढ्यात गल्लीच्या तोंडावर भोपळ्या चौकातुन दोन पोलीस माझ्याकडे येत असताना दिसले.मी पटकन आमच्या वाड्यात शिरलो आणि कडी लावून वर पळालो.हळूच खिडकीतून बघितले.त्या दोघांनी वाड्याचे बराच वेळ निरीक्षण केले,दंडुका दारावर आपटला,पण कोणतीही हालचाल न दिसल्यामुळे तेथून ते निघून गेले.

satyagrahi1975@gmail.com