आणीबाणी आणि आम्ही मैत्रिणी - सौ. आरती अरविंद शिराळकर

१९७५च्या शालान्त परिक्षा होईपर्यंतचं माझं जग फक्त शाळेपर्यंतच सीमित होतं. मात्र हुजूरपागेसारखी उत्तम शाळा आणि शनिवारपेठेत असलेलं घर या दोन गोष्टींमुळे आमच्या नकळतच समाजातील घडामोडींचे पडसाद आमच्या मनात रुजत असावेत. अधूनमधून अम्रुतेश्वराच्या देवळात भरणाऱ्या समितीमध्ये गेल्यामुळे आसपासच्या समवयस्क मुलींशी तोंडओळख होती. आमच्या वाड्यातही नियमीतपणे संघशाखेवर जाणारे बरेच लोक असल्याने त्यांच्या विर्षिक शिबिरांसाठी शिधा किंवा पोळीभाजी जमा करणं एवढंच काय ते आमचं सामाजिक योगदान वगै. काय म्हणतात ते असायचं.  

 

अकरावीनंतरची मोठी सुट्टी संपली आणि गरवारे काँलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा खऱ्या अर्थाने प्रथमच मी लकडीपूल ओलांडला असं म्हटलं तरी चालेल.  तर अशी ही मी, एकदम सत्याग्रहकरून जेलमध्ये जायला कशी तयार झाले? तर मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या भोवताली चालू असलेल्या घडामोडी नकळतपणे आपल्या मनात कुठेतरी रूजत असतात आणि योग्य वेळ येताच त्या प्रकटही होतात असं वाटतं.

 

आमचं काँलेज सुरू होण्या अगोदरच इंदिरा गांधींनी आणिबाणी जाहीर केली होती. पण मलातरी त्याच्या परिणामांची फारशी जाणीव नव्हती. पण जेव्हा आपटे घाट, नेने घाट, आमचा वाडा आणि जवळच राहणाऱ्या मा. रामभाऊ म्हाळगी यांच्या वाड्यात तसंच मोतीबागेतही सतत बैठका होऊ लागल्या, वातावरणात अशांतता जाणवू लागली आणि ऐकून माहीत असलेल्या मातबर नेत्यांची धरपकड सुरू झाली, तेव्हा त्याचा अर्थ हळूहळू उलगडायला लागला. तोपर्यंत डिसेंबर उजाडला आणि आसपासच्या जाणत्या मंडळींनी (उदा. हरीभाऊ नगरकर, गिरीश बापट ,शरद कानीटकर, अरूणा ढेरे) आमची एक बैठक घेतली. आपापल्या काँलेजमध्ये साताठ जणांच्या ग्रुपने आणिबाणी विरोधात घोषणा देऊन सत्याग्रह करायचा असं ठरवण्यात आलं. 

 

आमच्या वाड्यातच राहणारी माझी सख्खी मैत्रीण राजू उर्फ भारती कुलकर्णी, मागच्या बाजूच्या वाड्यात राहणारी अमला फडके, नंदा देशपांडे अशा माहीत असलेल्या अनेकजणी माझ्या बरोबर आहेत म्हटल्यावर वडिलांनीही परवानगी दिली.   खरंतर अशोक रबडे, शरद कानिटकर अशा कार्यकर्त्यांनी काही महिन्यांची शिक्षा होऊ शकते अशी कल्पना त्यांना दिली होती.  माझा स्वभाव बघता मी खरंच सत्याग्रहात भाग घेईन आणि घेतला तरी आम्हाला अशी शिक्षा होईल यावरच त्यांचा विश्वास नव्हता.  तरीदेखील आदल्या रात्री, "तू असं काही केलंस तर माझी ही सरकारी नोकरी जाऊ शकते" अशी भीती मला दाखवली होती पण आम्ही दोघांनीही ती गोष्ट मनावर घेतली नाही.  माझ्याच वर्गातली माझी मैत्रीण वासंती सोमण, संजीवनी भवाळकर या दोघीतर मला माहिती होत्या, पण आम्हाला थोड्या सिनीअर असणाऱ्या मेधा द्रवीड आणि कला शाखेची शैला फडके तसेच अनिल कुलकर्णी यांच्याशी काहीच ओळख नव्हती.  अशा आम्ही काही  विद्यार्थ्यांनी गरवारे काँलेजवर सत्याग्रह केला.  त्याच वेळी, त्याच दिवशी, अकरा कॉलेजेसमध्ये त्यात्या कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थीनिंनी सत्याग्रह केला.  ती तारीख होती ११ डिसें. १९७५.  काँलेज सुरू होऊन जेमतेम चार पाच महिने झाले होते.  अजून वर्गातील मुलामुलींशीही नीटशी ओळख झालेली नव्हती. अशावेळी सत्याग्रह केल्यामुळे आमच्या भोवती हीsss गर्दी जमली.  आणिबाणी लादण्याच्या सरकारच्या निर्णया विरूद्ध घोषणा दिल्याने आणि जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या गुन्ह्याखाली आम्हाला पोलिसांनी पकडून त्यांच्या त्या जाळीवाल्या गाडीतून डेक्कनच्या पोलिस स्टेशनला नेलं.  काही वेळातच इतर काँलेजांमधील सत्याग्रहींची एकच झुंबड उडाली.  तेथे कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मग मुलामुलींना वेगळं करण्यात आलं.  तोपर्यंत कोर्टाची वेळ संपल्यामुळे सगळ्यांना येरवडा जेलमध्ये नेण्यात आलं. 
 

 

आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, उलट लोकशाहीच्या विरोधात वागणाऱ्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा निषेध करून आपलं कर्तव्यच केलं आहे हे मात्र पक्कं ठाऊक होतं.  आपण गुन्हेगार नसून राजकीय कैदी आहोत हे माहित असल्याने जेलची भीती अजिबातच वाटली नाही.  स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय कैद्यांचे हाल माहित होते, पण आतातर आपण स्वातंत्र्यात असल्याने कोणतीच भीती वाटली नाही.  प्रत्यक्ष ओळख कोणाचीच नव्हती तरी बाहेर असलेले ज्येष्ठ नेते आपली योग्य ती काळजी घेतील असा विश्वास होता.  का ते मात्र त्यावेळी कळत नव्हतं.

 

जेलची ती भली मोठी दारं, आणि त्यातून आंत जाण्यासाठीमात्र छोटी दारं. असे तीन दरवाजे ओलाडून आम्हाला एका मोठ्ठ्या बऱ्याकीत नेण्यात आलं.  रांगा करून आमची गिनती करण्यात आली.  नावाचा पुकारा करताना आडनाव गायब झालेलं होतं.  फक्त वडिलांच्याच नावाचा आधार होता.  विनया श्रीक्रुष्णsss असा पुकारा व्हायचा.  आजपर्यंत आईला सोडून फक्त आजोळी राहिलेल्या मला तीस/पस्तीस मैत्रिणींबरोबर रहायला मिळणार म्हणून मज्जाच वाटत होती.  तो त्या वयाचाच परिणाम होता.  आई / मावशीच्या वयाच्या समितीत जाणाऱ्या अनेकजणी तिकडे सत्याग्रही म्हणून आलेल्या होत्या.  शिवाय थोड्याच अंतरावर मिसाखाली अटक झालेल्या अनेक मान्यवर स्त्रिया होत्या.  अर्थात त्यांची थोरवी मलातरी जेलच्या मुक्कामात समजली.  अगोदर त्यांच्याविषयी काहीही माहिती नव्हती,  आमच्यासारख्या कच्च्या मडक्यांना पक्कं बनवाण्यासाठीची योजना या ज्येष्ठ नेत्यांकडे तयारच होती बहुधा.  कारण दुसऱ्याच दिवसापासून आमचा दिवसभराचा कार्यक्रम अगदी भरगच्च असायचा.  सकाळी लवकर उठून अंघोळी आटोपून झाल्या की, पंडित मावशी, फगरे मावशी किंवा फडके मावशी या समितीची शाखा भरावयाच्या.  रीतसर ध्वज उभारून प्रार्थना, देशभक्तीपर गीते, योगासने, कवायत असं सगळं आमच्याकडून करवून घेत.  उशिराने उठणाऱ्या किंवा अंघोळीचा नंबर न लागल्यामुळे काही जणींच्या राहिलेल्या आंघोळी उरकायला थोडा मोकळा वेळ मिळायचा.  तोपर्यंत नाश्त्यासाठी कांजीचं अॅल्युमिनियमच पातेलं घेउन एखादी बाई येत असे.  चहा, कॉफी, पाणी, कांजी असं सगळंच त्या एकाच अॅल्युमिनियमच्या टमरेलवजा मगमद्ध्ये घ्यावं लागे.  हे जरा जडच जात होतं स्विकारायला पण ठीक आहे, जेलमध्ये कोण पुरवणार होते आमचे लाड !     

 

 

खरंतर हे खरं नव्हे बरं का ! कारण नुकत्याच शालेय जीवनातून बाहेर पडलेल्या आम्हा मुलींचे लाड, मिसाखाली अटक झालेल्या जयंतीबेन मेहता, अहिल्याबाई रांगणेकर, प्रमिलाताई दंडवते, सुमतीताई सुकळीकर, छबुताई देंसाई , प्रमिलाताई टोपले, कालिंदी फाटक अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून आलेल्या कितीतरी नामवंत  मंडळींनी प्रेमाने पुरवले. जेलकडून नाश्त्यासाठी दहावाजाता कांजी मिळायची.  इतकावेळ आम्ही मुली उपाशी राहणार म्हणून त्यांचा जीव कळवळायचा.  त्यांना चहा, कॉफी, दुध, बन किवा ब्रेड, बटर आणि काही फळं असं मिळत असे.  त्यातलं थोडं थोडं त्या आम्हाला द्यायच्या.  घरी मी चहा वगैरे काहीच घेत नसे.  पण ती कांजीही आवडायची नाही. एकदम एक वाजता जेवायचं तर भूक लागून जायची.  हळूहळू मीपण कॉफीत बुडवून तो बटर लावलेला ब्रेड खायला शिकले.  बटरमधल्या त्या मीठाची चव कॉफीमध्ये उतरायची.  आमच्यापैकी काहीजणी तर घरी आल्यावरही कॉफीत किंचितस मीठ घालून घ्यायच्या.  इतकी त्या चवीची सवय झाली होती. तुम्हाला खोटं वाटेल पण त्यांच्यामुळेच आम्हाला आंघोळीला गरम पाणीही मिळायचं.  याचीमात्र आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती.  ठराविक वेळेत नाही केली तरमात्र त्या डिसेंबरच्या थंडीत गार पाण्याने अंघोळ करावी लागे.  साधारण एक वाजता जेवण येई.  तोपर्यंत आम्हा मैत्रीनिमच्या खूप गप्पा, चेष्टामस्करी चालायची.  पहिला आठवडा सत्याग्रहाच्या सुरस कथा ऐकण्यात संपला. प्रत्येक कॉलेजवर वेगळा अनुभव.  एस पी कॉलेजवर महिला पोलीस उपलब्ध न झाल्याने पोलिसांना पटकन अटल करता येईना. भारतीने त्याचा चांगला फायदा करून घेतला.  तासभर रहदारी अडवून, घोषणा देत, आणीबाणीविरुद्ध लढण्याची गरज लोकांना पटवून दिली.  आपापल्या सवई आणि आवडीनिवडीनुसार आमचे छोटेछोटे ग्रुपही जमू लागले.  आता काहीकाही जणींची नावं देखील विसरायला झाली आहेत.  हेमा पाद्ध्ये, सुनीता पुराणिक, वैजू कुंटे, भारती पाटणकर, अनिता कुलकर्णी, मंगल वझे, शोभा आठवले, मेधा गोखले, नंदा देशपांडे, मालू दांडेकर, सुषमा दांडेकर, वनिता जोग, रंजना शितोळे, किती नावं सांगायची!  आयुष्यभरासाठी आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी झालो.

 

 

आठ दहा दिवसांनी समजलं की आम्हाला जेवण आणून देणाऱ्या, कांजी आणून देणाऱ्या,  आमचं जेवण बनवणाऱ्या या सगळ्याजणी गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगणाऱ्या होत्या.  सुरवातीला थोडी भीती वाटली, पण त्यांच्याशी बोलल्यावर समजलं की त्याही अगदी तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य स्त्रिया आहेत.  कुठल्यातरी एखाद्या क्षणी मनाला आवर घालू न शकल्याने आज त्यांच्यावर इथे अडकून पडण्याची वेळ आली आहे.  त्यांना कळायचं नाही की या चांगल्या घरातल्या मुली इथे कश्या आल्या?  आम्ही समजावून सांगायचो त्यांना.  आमच्याशी गप्पा मारायला त्यांनाही खूप आवडायचं.  एकेकीच्या कहाण्या ऐकून खूप वाईट वाटायचं.  काहीजणी तर आमचे कपडेही धुवू लागायच्या.  नको म्हटलं तरी ऐकायाच्याच नाहीत.  म्हणायच्या, तुम्हाला सवय नसेल.  अर्थात आम्ही कधीच त्यांच्याकडून आमची कामे करून घेतली नाहीत.  त्यावेळी वाईट अर्थाने गाजलेल्या मानवत खून खटल्यातील आरोपी स्त्रिया तिथे होत्या.  एक परदेशी महिलाही होती.  अर्थात त्यांच्या कोठड्या वेगळ्या होत्या.

 

 

आमच्याबरोबर असणाऱ्या ज्येष्ठ स्त्रिया आणि मिसाखाली अटक असणाऱ्या महिला आता आमच्या मावश्याच झाल्या होत्या.  फक्त त्या दोन अडीच महिन्यांसाठी नव्हे तर नंतरही बराच काळ आमच्यापैकी अनेक जणीं त्यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या.  त्या पुण्यात आल्या की आम्ही आवर्जून त्यांना भेटायला जायचो.  त्यांच्यापैकी बऱ्याचजणी आज आपल्यात नाहीत.   रोज एकेकजण एखादा विषय ठरवून   त्यावर अगदी सोप्या भाषेत व्याख्यान द्यायच्या.  कार्ल, मार्क्स यांची विचारसरणी, संघ, समाजवाद, कम्युनिझम तसेच कॉन्ग्रेस  या साऱ्यांच्या विचारधारा त्यांच्यामुळेच आम्हाला समजून घेता आल्या. खरंतर आणीबाणीविषयीची सखोल आणि सविस्तर माहितीसुद्धा त्यांच्याकडूनच समजली आम्हाला.  इंदिरा गांधीनी केलेली लोकशाहीची गळचेपी, जयप्रकाशजी नारायण यांनी त्याविरुद्ध लढण्यासाठी केलेलं विद्यार्थ्यांच संघटन आणि संपूर्ण देशात उसळलेले ते सत्याग्रह, ज्येष्ठ नेत्यांच्या धरपकडी, काहींनी भूमिगत राहून केलेलं काम ह्या सगळ्याची समज आम्हाला केवळ त्यांच्यामुळेच आली. आमची दृष्टी समाजाभिमुख झाली ती केवळ या जेलच्या अनुभवामुळेच.

 

 

पंधरा दिवसांतून एकदा आमचे घरचे लोक आम्हाला भेटू शकत होते.  आम्ही घरी पत्रही पाठवू शकत होतो.  भेटायला कोणाचेही नातेवाईक येवोत, आम्हा सगळ्यांसाठी भरपूर खाऊ घेऊन येत असत.  आलेल्या खाऊचा एका दिवसात चट्टा मट्टा व्हायचा.  रोज त्या मिलोच्या (लाल ज्वारी) भाकारीवजा पोळ्या आणि ती बावन पत्तीची भाजी म्हणजे न ओळखू येणाऱ्या कुठल्यातरी गवतासारख्या नुसत्या उकडलेल्या भाज्या, आणि थोडाथोडासा भात खाऊन घरच्या जेवणाचं महत्व चांगलंच कळायला लागलं होतं.  रविवारी फिस्ट म्हणूल लिंबा एवढा डालडाचा गोळा आणि थोडासा गुळ मिळत असे.  दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणत तोही खात होतो आम्ही.  रात्रीसुद्धा तेच जेवण.  मलातर भात आधीपासूनच आवडायचा नाही.  भारतीलातर लोणच्याशिवाय जेवण अशक्यच वाटायचं.  पण ह्या दोन अडीच महिन्यांच्या कारावासात आम्ही सगळ्याच जणी खूपकाही शिकलो.  एरवी ते आम्ही कधीच अनुभवलं नसतं.  बहुतेक सगळ्यांची वजनं तीनचार किलोनेतरी कमी झाली होती.  एकमेकींच्या सहवासात आम्ही खुश होतो.  अभ्यासासाठी आम्हाला घरून वह्या पुस्तकेही मिळाली होती.  मेधा आमच्या अभ्यासातील अडचणी सोडवायची.  काही कुरबुरी झाल्या तर शैला समजावून सांगायची.  अमलाचीतर आई आणि मावशी दोघीही तिथेच होत्या.  त्यांचा खूप आधार आणि किंचितसा धाकही होता.  आम्हा मैत्रिणींच्या मजा मस्तीत मात्र त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही.  थोड्याच दिवसात अरुणा ढेरेही सत्याग्रह करून आमच्याबरोबर आली होती.  तीने आणि मेधाने मिळून आमचा एक छानसा गाण्यांचा कार्यक्रमही बसवला होता, खास प्रजासत्ताक दिनासाठी.  खास त्या दिवसासाठी आम्ही सगळ्याजणी पांढऱ्या साड्या  नेसलो होतो.  अर्थात त्या आम्हाला आमच्या मावश्यानीच मोठ्या प्रेमाने नेसायला दिल्या होत्या.  समर गीतं आणि परिषद गीतं आम्ही सगळ्यांनीच मोठ्या आवेशात म्हटली.  प्रज्ञाचं (धारप) नुकतच लग्न झालं होतं.  तिचीही खूप चेष्टामस्करी करायचो.  तिची पहिली संक्रातही आम्ही साजरी केली होती.  घरून आणि बाहेर असणाऱ्या लोकांनीही आमच्याकरिता भरपूर गुळाच्या पोळ्या पाठवल्या होत्या.  त्या दोन दिवसात संपल्या हा भाग वेगळा.  थंडीचे दिवस असल्याने भूक खूप लागायची.  तिथे शिरीषाची भरपूर झाडं होती.  मस्त फुलली होती.  त्या फुलांच्या कोवळ्या गुलाबी रंगाच्या त्या रेषांरेषांच्या पाकळ्या मला फार आवडायच्या.  गुलमोहोरही होता.  त्यांचे गुच्छ करून भारती कुलकर्णी आणि मंगल वझे यांचे वाढदिवसही साजरे केले होते आम्ही. शैला शिट्टीवर गाणं मस्त म्हणायची. अरुणाकडेतर शांता शेळके, दुर्गा भागवत,  बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, इरावती कर्वे, मंगेश पाडगावकर, भा. रा. तांबे अशा कितीतरी दिग्गज कवींच्या कवितांचा खजिनाच होता.  वासंतीला आम्ही रोज गाणं म्हणायला लावायचो.  तिची  “सोऽऽऽ हं हर डमरु बाजे“ आणि “रस्मे उल्फत” आणि गुरुपादुकाष्टक आजही जशीच्या तशी कानात घुमतात.  सहव्वीस जानेवारीचा कार्यक्रम सोडला तर संजीवनी भवाळकर आमच्यात कधीच नसायची. त्या वयापासूनच तिचा ओढा अध्यात्माकडे होता.  नंतरही कधी ती आम्हाला भेटलीच नाही.

 

 

जेलच्या बाहेर येण्याचं आमच्या आवडीचं निमित्त असायचं ते म्हणजे कोर्टाच्या तारखांना आम्हाला कोर्टात हजार करायचे ते.  कोर्टात जज्ज समोर नेलं आणि त्यांनी तुम्हाला गुन्हा काबुल आहे का असं विचारलं तर “काही वाद न घालता फक्त “कबूल” असं म्हणायचं. नाहीतर शिक्षा वाढत जाते” असं आम्हां सगळ्यांना अगोदरच सांगण्यात आलं होतं.  तिकडे आमच्या घरचे लोक आम्हाला भेटायला खूपसारा खाऊ घेऊन यायचे.  त्यांच्या डोळ्यात आमची, आमच्या अभ्यासाची काळजी दिसायची.  एकदा तर माझे काका हैद्राबादहून आले होते. “ दंड भरून तुला घरी नेऊ का?”  असं विचारात होते.  अर्थात आम्ही कोणीच अशी सुटका करून घ्यायला तयार होणं शक्यच नव्हतं.  आमचे तिकडे काही हाल होत नाहीत, आम्ही अभ्यासही करतो आणि अगदी मजेत आहोत हे पटवून देण्यासाठी आम्ही मावशांच्या छान छान साड्या नेसून मस्त तयार होऊन जायचो.  कोर्टात गेलो की बाहेरच्या बातम्याही कळायच्या.  आमच्याबरोबर सत्याग्रह केलेल्या मुलांची रवानगी विसापूर जेलमद्ध्ये झाली होती.  त्यांचे तिकडे खूप हाल झाले.  बाहेर असलेले कार्यकर्ते तिकडेही खाऊ पोहोचवायचा प्रयत्न करायचे पण तिकडचे जेलचे अधिकारी तो परत पाठवत.  घरच्या लोकांना भेटायलाही परवानगी नव्हती.  खूप डास चावायचे, हातापायांवर फोड यायचे.  त्या कडाक्याच्या थंडीत गार पाण्यानेच अंघोळ करावी लागे.  बाहेरच्या बातम्याही कळायच्या नाहीत.  त्या मुलांनी खऱ्या अर्थाने कारावास अनुभवला असं म्हणता येईल.

 

 

तीन चार वेळा कोर्टाच्या पुढच्या पुढच्या तारखा पडत पडत अखेरीस दीड, दोन अडीच महिन्यांच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या.  शिक्षेचा कालावधी वेगवेगळा का? या प्रश्नाला “त्या त्या जज्जची मर्जी” एवढंच उत्तर होतं.  एस, पी. कौलेजवर सत्याग्रह केला त्यांना दीड महिना, एम. इ. एस. वर केलेल्यांना दोन, बी.एम.सी.सी.वाल्यांना अडीच महिने अशा वेगवेगळ्या मुदतीच्या शिक्षा झाल्या.  ज्यांची दीड महिन्यातच सुटका झाली, त्यांना खुप वाईट वाटत होतं. आता ह्या मैत्रिणी सुटून बाहेर येईपर्यंत आपल्याला भेटणार नाहीत म्हणून; तर दोन महिन्यांनी बाकीच्या गेल्यावर राहिलेल्यांना करमणार नाही म्हणून त्याही खट्टू झाल्या होत्या.  चोवीस तास मैत्रिणीसोबत इतके दिवस, त्या वयात एकत्र राहायला मिळण हि आमच्यासाठी विलक्षण आनंदाची गोष्ट होती.  एकमेकींना समजून घेणं, एकमेकीना साथ देणं, प्रसंगी आधार देणं, दुसाऱ्या व्यक्तीचं ऐकून घेणं,  आपल्या आयुष्याची दिशा ठरवणं, आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या व्यक्तीचा आदर करणं अशा कितीतरी गोष्टी आम्ही सगळ्याचजणी या कारावासामुळे शिकलो. आमचं व्यक्तिमत्व तिथेच अंकुरलं.  आणि बाहेर आल्यावर विद्यार्थी परिषदेमुळे बहरलं.  समाजाभिमुख झालं. 

 

 

११ फेब्रुवारी १९७६ या दिवशी आमच्या बॅचची सुटका झाली.  आतामात्र अभ्यासाकडे लक्ष द्यायलाच हवं होतं.  कॉलेजमधील मैत्रिणी आणि शिक्षक अश्या सगळ्यांनीच आम्हाला खुप मदत केली.  अभ्यंकर सरांनी आमचा बुडलेला अभ्यास करून घेतला.  अभ्यासाबरोबरच आता आमचे बाहेरचे उद्योगही वाढले होते.  विद्यार्थी परिषदेत जाऊ लागलो. संध्याकाळी एका झोपडपट्टीत मुलांना शिकवायला जायचो. आणीबाणी विरुद्ध सारा देश पेटून उठला होता.  मोहन धारिया, सुब्राह्मण्याम स्वामी, पु.लं.देशपांडे, भाई वैद्य, काका वडके, अनिरुद्ध देशपांडे सर, प्रकाश जावडेकर, डॉ. अरविंद लेले, सुर्यकांत पाठक, गिरीश बापट अशा कोणाचीही सभा असो आम्ही तिथे जायचोच. त्यानंतरच्या निवडणुकीचा प्रचार करायलाही रिक्षातून घोषणा देत पार नेहरूनगर, चिचवड पर्यंत जायचो.  त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे.  देशासाठी तो काळ वाईटच होता, पण त्यामुळेच आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली एवढं मात्र नक्की.