आणीबाणी आठवणी - सुनील दळवी

१९७५ साल होते. मी बी एस्सी दुसर्या वर्षाला होतो. त्या वर्षी विद्यापीठातल्या प्राध्यापकांचा अभूतपूर्व संप झाला होता. त्यामुळे सर्व परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यावेळी आमची परीक्षा में अखेर सुरु झाली आणि जुनच्या पहिल्या आठवड्यात संपली. पुण्यात रमणबागेत संघ शिक्षा वर्ग भरला होता, मी वर्गाला जाणे अपेक्षित होते पण मी वर्गात चक्कर सुद्धा मारली नव्हती परीक्षा संपल्यावर मी जेव्हा वर्गात गेलो तेव्हा वासुदेवराव देशपांडेंनी मला चांगलच झापल होत. परीक्षा संपल्यावर सुट्टीच होती माझे काका बडोदा इथे असतात त्यांच्याकडे जायचे आधीच ठरवले होते. त्याप्रमाणे जून १९-२० तारखेला मी बडोद्याला गेलो. आणि बडोद्यात असतानाच आणिबाणी जाहीर झाल्याची बातमी कळली त्याचबरोबर आडवाणी वाजपेयी इ. ना अटक  केल्याचे कळले. काही तरी गंभीर घडत आहे हे कळले पण नक्की गांभीर्य लक्षात आले नव्हते. नंतर ४-५ दिवसांनी परत येताना मुंबईत ३-४ दिवस राहिलो होतो  मुंबईत  असताना संघावरील बंदीची बातमी वाचली पू. बाळासाहेब देवरसांना अटक झाल्याचे वाचुन मनात चलबिचल झाली. १-२ दिवसांनी दुपारच्या जनता एक्सप्रेसनी(आताची सिंहगड)  पुण्यात आलो. येत असताना मनात अस्वस्थता होती पुण्यात परिस्थिती काय असेल घरचे वातावरण कसे असेल कारण वडीलांनी सुद्धा ४८ साली सत्याग्रह केला होता. त्याच अवस्थेत स्टेशनवर उतरलो मनातली अस्वस्थता बहुतेक चेहर्यावर दिसत असावी कारण स्टेशन मधुन बाहेर पडताना प्लेनक्लोथ वाल्यानी मला बरोबर हेरल आणि बाजुला घेऊन माझी आणि सामानाची झडती घेतली. तेव्हाच वाटले की हे आणिबाणीचे प्रकरण साधेसरळ नाही. पुण्यात आल्यावर शाखेतील नेहमीच्या सर्वांना भेटलो. 

शाखा तर  बंदच होत्या संध्याकाळी इकडे तिकडे फिरणे गप्पा मारणे असाच उद्योग होता शिवाय सुचनाही काही नव्हत्या.  असाच महिना दीड महिना निघून गेला टाईम पास चालूच होता. 

तेव्हा एकदा वसंत खरे आला आणि म्हणाला आज रात्री आपण जरा बसूया. एकदा बसुन बोलुया. खर म्हणजे बैठक घ्या असा निरोप आला होता पण त्याने तस काही जाणवू दिलं नाही. ठरल्या प्रमाणे आम्ही त्याच्या घरी गेलो.  त्याच्या घरी दोन ग्रुहस्थ आले होते दोघेही पॉश कपड्यात होते त्यातले एक तर फारच रुबाबदार होते. ते तात्या बापट होते आणि दुसरे दामु अण्णा दाते होते. नेहमी बघणार्यांना सुद्धा ते चटकन लक्षात येत नव्हते. गुप्त बैठकीचा तो पहिला अनुभव होता. 

तात्यांनी विचारले आणिबाणी वर लोकांची प्रतिक्रिया काय आहे.  आमच्या मगदुराप्रमाणे आम्ही उत्तरे दिली. 

आता लक्षात येत की कोणतीही योजना आखायची असेल तर समाजाची स्थिती काय आहे हे  लक्षात घेणं आवश्यक आहे. तो बहुदा ऑगस्ट महिना होता. त्या वेळी साधारणपणे गुरुपूजनाचे उत्सव होत असतात. तात्या पुढे म्हणाले आता आपल्याला उत्सव घेता येणार नाही पण गुरुदक्षिणा मात्र गोळा केलीच पाहिजे. आता परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे पैसे नेहमीपेक्षा खूप जास्त लागणार आहेत. तेव्हा गुरुदक्षिणा जास्त मागायला पाहिजे. मी मागच्याच आठवड्यात एका उद्योगपती कडुन १ लाख रुपये आणले. ते म्हणत होते १लाख शक्य नाही कारण उद्योगात, मला ५०लाखाच नुकसान झालयं. पण मी त्यांना म्हटल नुकसान ५१लाख झाले असे समजा पण पैसे द्या. तात्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाइलने बैठक घेतली आणि त्यामुळे आमचा विश्वास बळावला, उत्साह वाढला. पण तात्यांनी बारीकसारीक सुचनाही केल्या. ऊदा. बैठकीला येताना सर्वांनी एकत्र यायचे नाही आपल्या सायकली ज्या घरात बैठक आहे त्या घरापाशी लावायच्या नाहीत, बैठक संपल्यावर एक एकट्याने बाहेर जायचे जेणेकरून बैठक असल्याचे बाहेर कळणार नाही. यावरुनच एक गोष्ट आठवते मी आता बिबवेवाडी येथे राहतो आमच्या शाखेचे कार्यवाह कै. विठ्ठल राव इनामदार यांनी एक आठवण सांगितली. आणीबाणीत त्यांच्या घरात अशीच एक बैठक चालू होती आणि अचानक पोलीस जीप त्यांच्या घरापाशी येउन थांबली. घरातील वातावरण एकदम गंभीर झाले. जीपमधूलन इन्स्पेक्टर उतरुन घरात आले.  ते विठ्ठल रावांच्या चांगल्या परिचयाचे होते ते विठ्ठल रावांना म्हणाले की काही नाही इकडे आलो होतो तेव्हा जाता जाता तुला भेटुन जावे म्हणून आलो. ५ मिनिट थांबून ते निघाले आणि जाता जाता म्हणाले की दरवाज्यात एवढ्या चपला आहेत ना त्या कुठेतरी आत ठेव आणि ते निघून गेले. अशा अनेकांनी संघाला छुपे पणे मदत केली. प्रशासनात संघाचे असे हितचिंतक ठिकठिकाणी होते आणि त्यांनी  संघाला जमेल तशी मदत केली आहे