आणीबाणीचा काळ  १९७५ ते १९७६ -  राजन रघुनाथ गंधे

२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकशाहीला लाथाडून व कायदा हातात घेऊन देशात आणीबाणी लादली.

कारागृहात अनुभवलेला काळ -- ११ डिसेंबर १९७५  ते २४ जानेवारी १९७६ (पूर्ण  ४५ दिवस.)

आलेला अनुभव आज ४३ वर्षा नंतर शब्द रुपाने आपल्या पुढे मांडत आहे. त्या वेळी आमच्या सगळ्यांची वये  १८ ते २० च्या मधील. हे आणीबाणी प्रकरण फार कोणाला माहिती नव्हते . पण पत्रके नेऊन

देणे, पहाटे वाटप करणे, निरोप पोचवणे इत्यादी कामे आम्ही अगदी जोशात करत असू, सर्व जण कसबा पेठेतील, मग सत्याग्रहासाठीची तारीख, वेळ कळाली, ११ डिसेंबर सा.६:३०. आम्ही शिकत होतो, सगळ्यांना निरोप मिळाले १० जण तयार झाले, घरी कोणाच्याही माहीत नाही, सर्व मध्यम वर्गामधील, राजू पाठककडे सकाळी ११ पर्यंत जमलो, जेवण झाले दुपारी सिनेमा पाहीला परत पाठक कडे आलो , सा. ६:३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात आलो

व मंडल करून ठरलेल्या घोषणा दिल्या, पत्रके वाटली, रहदारी दोन बाजूने जाम झाली, सत्याग्रह फत्ते झाला. पोलीस आले वायरलेसवर त्यांचे बोलणे झाले मग धरले, पत्रके काढून घेतली , मग गाडी मधून विश्राम बाग वाडा पोलीस स्टेशन येथे आलो मग त्यांच्या नियमाप्रमाणे नाव,पत्ते झाले, तुम्हाला कोणी पाठवले त्यांची नावे सांगा, इतर सर्व ढोस देऊन झाले. मग मोठे साहेब आले त्यांनी परत चौकशी करत असताना दोन जण लेंगा व शर्ट मधील ( L I B ) आले ते साहेबांच्या कानात काही तरी सांगत होते, मग साहेब म्हणाले तुमच्या पैकी तीन जणांना हे चांगले ओळखतात, ते जे आहेत त्यांनी पुढे या, मग सर्वत्र शांतता ,सगळे जण आम्ही एकमेकाकडे बघत राहीलो, की हा काय प्रकार आहे मग LIB  पुढे आले,त्यांनी आंम्हा तिघांना  पुढे बोलवले व म्हणाले साहेब हेच ते , गुजराती केळवणी शाळे पाशी नाना वाडा ते सकाळ ऑफिस रत्यावर या पोरांनी आम्हाला पहाटे लोखंडी मुठींने बेदम मारले व पळून गेले, ह्यांच्या कडे पत्रके होती व ते टाकावयास निघाले होते,त्याना आम्ही अडवले व चौकशी करत होतो, पहाटेची वेळ ३:३० वाजले असतील, एक सायकल व तीन जण होते, हेच ते साहेब, हेच होते. साहेब आज ११ ता. त्या दिवशी सोम.८ तारीख होती .साहेब पुढे आले व म्हणाले हे खरे आहे का? आमची माणसे चुकणार नाहीत, कबुल करा, साहेबांनी आम्हाला बाजूला घेतले व म्हणाले सांगा आता. 'आम्ही नव्हतो साहेब'. साहेब म्हणाले,'मी सांभाळून घेतो, परत असे करू नका, मग म्हणाले घरी माहिती आहे का? जेवण रात्री घरुन पाठवयाला सागंतो .येथील मिलोची भाकरी व भाजी तुम्ही खाऊ शकत नाही' व त्या दोघांना साहेब म्हणाले ते हे नाहीत,ही चांगल्या घरातील व शिकणारी मुले आहेत ह्यांच्यां पालकानां बोलवा.मग पालक आले जेवण आले , चार्जशीट झाले. दोन दिवसांनी कोर्ट मग शिक्षा, मग येरवडा जेल, मग दि.२१ डिसेंबर १९७५ ला विसापूर जेल व ता.२४ जानेवारी १९७६ ला रेल्वे वॉरंट घेऊन पुण्याला परत, पण त्या दिवशी सापडलो असतो तर ,हा सत्याग्रह करता आला नसता व साहेब काकांच्या ओळखीचे असल्याने दि.८ डिसेंबरचा आम्ही पहाटे केलेला प्रताप त्यांनी अगदी व्यवस्थित दाबून टाकला. आम्हा तिघांना मधील एक जण आता आमच्या बरोबर नाही. आता त्याच्या मिसेसचा अर्ज देताना खूप आठवणी ताज्या झाल्या, तो बरोबर आहे व सदैव बरोबर राहणार  व सुधीर मध्ये असणारा धीर व धमक ,धारीष्ट अजून  आम्हा मध्ये आहे. आमच्या १० जणांना पैकी आता ३ जण नाहीत