आणिबाणी आठवणी-४ - सुनील दळवी

येरवडा जेलमध्ये मिसा बंदी एका वॉर्डमध्ये होते आणि सत्याग्रही एका वॉर्ड मध्ये होते. आमच्या वॉर्डमध्ये सत्याग्रहींशिवाय इतर कोणी कैदी  नव्हते, त्यामुळे तुरुंगात आलो आहोत असे वाटतच नव्हते. नाही म्हणायला शिपाई आणि इतर कैदी यांची ये-जा चालायची त्यामुळे तुरुंगात असल्याची जाणीव व्हायची. आमच्या आधी काही जण सत्याग्रह करून आले होते. त्यात सुरेश नाशिककर होते. दोन चार दिवसांत गिरीष बापट आले. तिथे दिवसाचा कार्यक्रम सेट झाला होता. दुपारी मिसाबंदींपैकी कोणाचा तरी बौद्धिक वर्ग/व्याख्यान होत असे. त्यामध्ये समाज वादी  मंडळी सुद्धा असत. एकंदरीत सर्वांचा टेंपो टिकुन होता. 

काही दिवसांनी दादा रावत आले. बहुदा ते एकटे च आले. त्याचा अर्थ त्यांना अटक झाली होती. तीन दिवस पोलीस कोठडीत राहुन ते आले होते. त्यांच्या स्व भावाप्रमाणे तीन दिवसात त्यांनी तिथल्या पोलीस शिपायांबरोबर,मैत्री जमवली होती. तिथला एक शिपाई जो हत्यारी पोलीस होता साधारण पंचविशीत होता. दिवसातल्या २५ तासांपैकी २२ तास ड्युटीवर असायचा. पोलीसांनी अाम्हाला अटक केली म्हणजे ते आमचे वैरी होते असे नाही. ते त्यांचे काम करत होते. पण यामुळे त्यांच्या परिस्थितीची कल्पना  येउन गेली. 

आमच्या बर्याकी मध्ये आमच्या वर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डन असत. ज्या कैद्यांनी बरीच वर्ष शिक्षा भोगलेली आहे आणि ज्यांची वर्तणुक चांगली आहे अशा कैद्यांना वॉर्डन म्हणून नेमतात. आमच्या बर्याकीमधे जे वॉर्डन होते त्यांना एका खुनाच्या केसमधे जन्मठेप झाली होती. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी केस लढवली होती. ते धुळ्याकडचे शेतकरी होते. त्यांना विचारले सुप्रीम कोर्टाचा खर्च किती आला. ते म्हणाले ४००००/-.हा आकडा ऐकुन आमचे डोळेच विस्फारले.  कारण त्यावेळी मित्रमंडळ जवळ १bhk फ्ल्याट त्या पेक्षा कमी किंमती मध्ये मिळत होता. आम्ही विचारले एवढ्या रकमेची सोय कशी केली. तर ते सहज म्हणाले  कापुस पिकवणाऱ्याला ४० हजार किती अवघड आहे.  आता मनात येत की त्यावेळी हमीभाव नव्हता, जेनेटिकली मॉडिफाईड बियाण नव्हते, उच्च तंत्रज्ञान नव्हत तरीपण शाळेत शिकल्या प्रमाणे कापुस हे खरोखर नगदी पिक होते.

- सुनील दळवी