आणिबाणी आठवणी-३ -सुनील दळवी 

दसरा झाला, दिवाळी झाली. दिवस जात होते. माझे कॉलेज पण सुरू होते. नोव्हेंबर मध्ये सेमिस्टर परिक्षा होती. त्यामुळे अभ्यासात लक्ष होते. अधुनमधुन बैठकी पण होत होत्या. होता होता आणिबाणी विरोधी लढ्याची योजना पण तयार झाली. आणिबाणी मध्ये घटना धाब्यावर बसवुन लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी केली म्हणून लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे ठरले. त्याकरता अखिल  भारतीय स्तरावर लोक संघर्ष समिती स्थापन केली. आणि त्या माध्यमातून लढा देण्याचे ठरले. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी बुलेटिन काढायला सुरुवात झाली. ही बुलेटिन्स छापण आणि वितरीत करण हे फारच धोकादायक होते.  कारण गुप्त चरांची करडी नजर सर्वत्र होती. ती पत्रक चोरुन छापावी लागत होती. छापुन झाल्यावर ताबडतोब ब्लॉक नष्ट करण्यात येत असे. छापलेली पत्रकं पहाटे ३ते४ यादरम्यान घरोघर वाटली जात असत. ही सुरुवात होती. आणिबाणी विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरले. १५ नोव्हेंबर नंतर सत्याग्रह करण्याचे ठरले आणि हे सत्याग्रह वेगवेगळ्या तुकड्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची योजना झाली.  हे सत्याग्रह पुढे २ महिने चालणार होते. माझी सेमिस्टर परीक्षा तोपर्यंत संपत होती त्यामुळे लगेचच सत्याग्रह करण्याची तयारी मी दाखवली. 
२७नोव्हेंबर ही तारीख नक्की झाली. त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात खुप गर्दी असते म्हणून मुकुंद नगरमधील सातारा रस्त्यावरच्या साईबाबा मंदिरात सत्याग्रह ठरला. आम्ही ५जणांनी सत्याग्रह करण्याचे ठरले होते पण ऐनवेळी एकजण आला नाही. म्हणून मी,माझा भाऊ सुबोध, आनंद कुलकर्णी, आणि धुंडिराज गोखले अशा चौघांनी सत्याग्रह केला. 
आम्ही हातात ब्यानर धरुन आणिबाणी विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. १०-१५, मिनिटे घोषणा दिल्या. आमच्या भोवती खूप गर्दी गोळा झाली होती. शेवटी आम्ही चालत स्वारगेट कडे जाण्यास सुरुवात केली. आमच्या मागे खूप मोठा जमाव येत होता. आम्ही घोषणा देत लक्ष्मीनारायण चौकात आले. तिथे स्वारगेट पोलीस चौकीतील सब इन्स्पेक्टर आणि ३पो लीसा शिपाई आले आणि त्यांनी आम्हाला अटक केली. त्याच दिवशी रात्री  स्वारगेट पो. स्टे. मधे नेउन सगळे सोपस्कार पार पडले आणि आमची रवानगी येरवड्याला झाली. २-३ तारखा पडुन १ महिना ७दिवस अशी शिक्षा आम्हाला ठोठावली.

-सुनील दळवी