आणिबाणि आठवणी-२ -सुनील दळवी 

हळुहळू आणिबाणी चा परिणाम जाणवु लागला. लोकांमधे भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले. जनता एका अनामिक दडपणाखाली होती. अनुशासन पर्व म्हणून आणीबाणीचा डंका पिटण चालू झाले. पण वास्तवात सरकारी दहशतीचा वरवंटा फिरत होता. काही बोलायची चोरी होती. माझ्या पत्नीचे माहेर कर्नाटकातले. तिच्या आईचे नाव इंदिरा होते. तर त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या इतर बायका तिला इंदिरा या नावाने हाक मारायला सुद्धा घाबरत होत्या. इतकी जबरदस्त भिती पसरली होती. 

संघाच्या ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला असावा. आणि आणिबाणी विरुध्द योजना आखण्यास  सुरूवात झाली असावी. कारण काही दिवसांनी २ ऑक्टोबर गांधी जयंती होती आणि त्या वेळी एक कार्यक्रम दिला. गांधी जयंती ला कुठे प्रार्थना नाही, मेळावा नाही, सूतकताई  नाही. नेहमीच्या कार्यक्रमातला कुठलाच कार्यक्रम नाही तर फक्त छातीवर एक बिल्ला लावायचा, आणि त्या बिल्ल्यावर लिहिले होते "निर्भय बनो".२ऑक्टोबरला देशभर लोकांनी असे बिल्ले लावले होते. कार्यक्रम अपेक्षे प्रमाणे यशस्वी झाला. याच दरम्यान काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांची एक बैठक झाली होती, आणि संख्या थोडी जास्त असावी. कारण बैठकीसाठी पोळ्या गोळा करण्याचा निरोप आला होता.  पण त्या दिवशी नागपंचमी होती. त्या काळात प्रथा परंपरा बर्यापैकी पाळल्या जात होत्या.  त्यामुळेच एक अडचण होती. कारण नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवत नसत तर पोळ्या कशा गोळा करायच्या? तरीही आम्ही पोळ्यांचा निरोप दिला. काही घरांतून पोळ्या मिळाल्या, काही जणांनी पोळ्यांच्या ऐवजी इतर पदार्थ दिले. परंतु ज्या प्रमाणात पाहिजे होते तेव्हडे मिळाले नाही. त्यामुळे बैठकीत खूपच  अडचण झाली होती. 

गांधी जयंती नंतर लगेचच दसरा होता. त्यावेळी एक कार्यक्रम ठरला. हिंदू तरुण मंडळामध्ये पुरण सिंग काची(चुक भुल द्यावी घ्यावी) बसणार आहेत त्यांना सर्वानी सोने द्यायला जायचे. खूप मोठ्या संख्येने स्वयं सेवक   सोने द्यायला गेले होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. दोन दिवसांनी पुण्यात खूप मोठी धरपकड झाली. एकाच रात्री ८-१० जणांना अटक झाली. 

दुसऱ्याच दिवशी दुपारी १२-१च्या दरम्यान स्रीधर पंत फडके घरी आले. ते जरा गंभीरच दिसत होते. नेहमी प्रमाणे बाहेर च्या खोलीत न बसता सरळ आतल्या 

खोलीत गेले. योगायोगाने किरण शाळीग्राम पण तेव्हाच घरी आला. त्याला अटकेची बातमी कळली होती. तो पण गंभीर दिसत होता. पंत फडक्यांनी किरणला थांबवून घेतला आणि मला  वासुदेवराव देशपांडेंना घेऊन यायला सांगितले. मी वासुदेवरावांच्या घरी गेलो तेव्हा ते घरीच होते. पंतांचा निरोप सांगितल्यावर ते  लगेच उठले. आम्ही दोघे घरी आल्यावर पंत आणि वासुदेवराव दोघेच अातल्या खोलीत हळू आवाजात बोलत बसले. किरण शाळीग्राम निघून गेला, अर्ध्या तासाने वासुदेव राव गेले त्या नंतर पंत फडके पण गेले.