आठवणी आणीबाणीतील

मी ज्ञानेश्‍वर तुपे. माऊली तुपे या नावाने मला ओळखले जाते. माझ्या माहितीप्रमाणे हडपसरमध्ये १९४० साली संघाची शाखा लागली, तेव्हा बाबाराव भिडे हवेली तालुक्याचे संघचालक होते. माणिकराव पाटील सायकलवरून संघशाखा लावण्यासाठी येत असत. आबनावे गुरुजी, विष्णू जाधव, ठकूजी आबनावे, रासकर हे त्या वेळचे स्वयंसेवक. पुढे आबनावे गुरुजींनी हडपसरमध्ये संघाचे काम वाढवले. १९६७ साली मी संघाच्या कामात आलो, तेव्हा सुरुवातीला माझ्याकडे हडपसर गावातील शाखा होती. पुढे गाडीतळ आणि माळवाडीत शाखा सुरू केल्या. त्यानंतर मंडल कार्यवाह म्हणून जबाबदारी आली. तेव्हा हडपसर परिसरात आठ शाखा होत्या. त्यावेळी विजयराव कळसकर, अरुण दीक्षित, सतीशचंद्र चावला, माधव मांडके, बंडे, शंकर तुपे इत्यादी कार्यकर्ते काम करत होते. याकाळात हडपसरला दामुअण्णा दाते, तात्या बापट इत्यादींचे प्रवास होत असत.

हडपसर हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला. तेव्हा तिथे संघ आणि जनसंघ यांचा प्रभाव नव्हता. स्थानिक लोकांच्या मदतीतून संघकामाला गती मिळाली. समाजवादी शाखेवर दगडफेक करत. विरोध होत असतानाही आम्ही संघशाखा चालू ठेवल्या. वसंतराव देवधर, हरीभाऊ कुलकर्णी हे पुण्यातून येणारे कार्यकर्ते आमच्या पाठीशी उभे राहत. काँग्रेस, समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्यात आम्ही काम केले.

आणीबाणी कालखंड

संपतराव शिंदे हे जुने कार्यकर्ते आहेत. मामा हजारे इत्यादींनी संघ वाढवला. संपतराव शिंदे हे माझ्या आधी मंडल कार्यवाह होते. त्यांनी चांगल्या प्रकारे जनसंपर्क तयार केला होता. त्यांच्यामुळेच मी शाखेत आलो. आणीबाणीच्या काळात संघाच्या लोकांना आधी अटक झाली नाही. तेव्हा आम्ही गुप्त बैठका घेत असू. त्यांची जबाबदारी माझ्यावर व हनुमंत जगदाळे यांच्यावर होती. रात्री-अपरात्री फिरून आम्ही निरोप देत असू. दोन-तीन महिने हा उपक्रम चालू होता. एक बैठक माळवाडी येथे शंकर तुपे यांच्या घरी घेतली. तेव्हा एस.एम. जोशींना बोलावले होते. समाजवादी मंडळींना बोलावले, पण समाजवादी कुणीही आले नाहीत. एस.एम. जोशींनी संघाच्या स्वयंसेवकांची बैठक घेतली. आणीबाणीत समाजवाद्यांनी हडपसरमध्ये काहीही केले नाही. सारेजण घरात गुपचूप बसले होते. त्यावेळी सत्याग्रह करण्याचे ठरवले. तो गांधी चौकात झाला. त्यात बाळासाहेब टेमगीरे, काळूराम कुदळे, शंकर तुपे यांना अटक झाली. मी मंडल कार्यवाह म्हणून मला अटक झाली. आबनावे गुरुजी, मामा हजारे यांनाही अटक झाली, असे सात-आठ जण हडपसर परिसरातील होतो. त्यातील काही येरवडा कारागृहात आणि काही नाशिक कारागृहात होते.

आणीबाणी उठल्यानंतर मोठा बदल आमच्या भागात झाला. शंकर तुपे आणि माझी मोठी मिरवणूक काढली होती. आम्ही कारागृहातून सुटून आल्यावर पुन्हा आपआपल्या कार्यक्षेत्रात काम करू लागलो. मी किसान संघाच्या कामात होतो, ते काम करू लागलो. खरेतर कारागृहातून सुटून आलेल्या लोकांना लगेच राजकारणात प्रवेश करता आला असता, पण तो मोह आम्ही टाळला. हडपसरमध्ये राजकीय क्षेत्रात मोठे बदल झाले.

‘गंगा पूजन यात्रा’, ‘लालकृष्ण अडवाणीजी यात्रा’ यांचे हडपसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. सोमनाथ ते अयोध्या ही अडवाणींची यात्रा त्यावेळी देशभर गाजत होती. हिंदुत्वाची जागृती मोठ्या प्रमाणात झाली. हडपसरमधील समाजवादी याकाळात नामशेष होऊ लागले. रामजन्मभूमी आंदोलनात १९८९ साली ११८ आणि १९९२ साली २०० स्वयंसेवक अयोध्येला गेले होते. खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. राजकीय क्षेत्रात मात्र हडपसरमध्ये समर्थ नेतृत्व अजून उभे राहिले नाही. पुढील काळात ते तयार होईल, असे चित्र दिसत आहे.

हडपसरमध्ये संघकामाचे वेगळे रूप जनसेवा बँकेच्या माध्यमातून लोक अनुभवत असतात. ही बँक संघस्वयंसेवकांनी सुरू केली आहे. ही बँक आज सर्व बाबतीत आघाडीवर आहे. संघ ज्या गोष्टीत पाऊल टाकतो ते चागंलेच असते, अशी लोकांची मानसिकता झाली आहे. हडपसर परिसरात परिवार क्षेत्रातील सर्व संस्थांचे काम चालते. किसान संघाच्या माध्यमातून एक मोठे आंदोलन राबवले गेले. ३८ गावे महापालिकेत घेतली होती. त्यावर आंदोलन होऊन वीस गावे महापालिकेतून बाहेर काढली. शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार होते. समाजाचा विचार करून ‘किसान संघा’ने आंदोलन चालवले. त्याला यश आले. समाजाचे जे जे प्रश्‍न आहेत, ते संघ विचाराने सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो.

‘हडपसर परिसरात संघ परिवारातील सर्व संस्थांचा खूप चांगला समन्वय असल्याने चांगल्या प्रकारे काम होत आहे. मी आता किसान संघाच्या माध्यमातून प्रांतस्तरावर काम करत आहे, त्याप्रमाणेच हडपसरच्या संघकामातही मी वेळोवेळी उपस्थित राहत असतो.

शब्दांकन : रवींद्र गोळे