आठवणी आणीबाणीच्या - सौ स्नेहल बिरजे (सुवर्णा कुलकर्णी)

आणीबाणी घोषित झाली तो दिवस मला आजही चांगला आवठवतोआहे. माझे बाबा, त्यावेळचे शिक्षक आमदार श्री. मुकुंदराव कुळकर्णी  राजस्थान च्या दौर्‍यावर होते. सकाळी अनेक जागा रिक्त असणारे वर्तमानपत्र पाहून वाटणारे नवल ओसरायच्या आधीच संघाच्या अनेक नेत्यांना  अटक करून तुरुंगातटाकल्याची बातमी येऊन धडकली. माझी आई सौ.हेमलता कुळकर्णी , जी महात्मा फुले हायस्कूल आदमबाग येथे मुख्याध्यापिका होती , ती शाळेत जायला निघाली असतानाच बाबांचा टंकाॅल आला . त्यांनी आईला सांगितल," संघाच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे. मलासुद्धा केंव्हाही अटक होऊ शकते. परंतु मला बाहेर राहूनच काम सांभाळावे अशी सुचना मिळालीआहे त्यामुळे मला भूमीगत व्हावे लागणार आहे. कदाचित अनिश्चित काळ आपला संपर्क होऊ शकणार नाही.काळजी करु नको." बस इतकच सांगून त्यांनी फोन बंद केला. आईला एक शब्दही बोलण्याची संधी मिळाली नाही. क्षणभर आई सैरभैर झाली. पण क्षणभरच! क्षणात तिनी स्वतःला सावरल. एका सच्च्या स्वयंसेवकाची ती पत्नी होती. आल्या  प्रसंगाला समर्थपणे तोंड देण्यास ती सज्ज झाली.

 

हळू हळू आणीबाणीचे चटके वाढू लागले. आणिबाणीचा विरोध आणि विरोध करणार्‍यांना दडपून टाकण्याचे सरकारचे प्रयत्न दोन्हीही दिवसेंदिवस प्रखर होऊ लागले. अनिलदादा (कै. अनिल काळे ) माझ्या बाबांचा स्वीयसहाय्यक , आई व मी पत्रके टायपिंग व सायक्लोस्टायलिंग चे काम रात्री अकरा वाजल्या नंतर करीत असू. दिवसा अथवा रात्री कधीही सी.आय.डी. चे लोक घरी बाबांची चौकशी करायला येत असत. त्यामुळे हे पत्रकांचे काम चोरुनच चालत असे. दिव्याचा प्रकाश बाहेरुन दिसू नये म्हणून खिडक्यांच्या काचांना जाड काळे पुठ्ठे लावून शिवाय जाड पडदे लावले होते. शिवाय टाईपराईटरचा आवाज येवू नये म्हणून रेडीओ सिलोन वर गाणी लावून ठेवत असू.त्यावेळी इतक्या रात्री केवळ तेच रेडिओ स्टेशन चालू असे. नंतर पुढे कोणाकडून तरी एका जुन्या टेपरेकाॅर्डरची सोय केली. एकच कॅसेट होती .तिच सारखी लावत असू. सकाळीसहा वाजता अनिलदादा पिशवीत खाली पत्रके आणि वर आदल्यादिवशी आणून ठेवलेल्या भाज्या रचून घेउन जात असे. आमच्या सोसायटीतील एका बाईंनी आईला विचारल होत की अनिलनी भाज्या विकायचा व्यवसाय सुरू केलाय का?

 

बाबांच काहीच खबरबात नाही असे तीन साडेतीन महीने गेले .एक दिवस अचानक त्यांचा फोन आला भाऊमामा पाष्टेकर आणि दोघे जण जेवायला व रात्री मुक्कामाला येतील. हे कोण भाऊमामा होते हे आम्हाला काही समजेना. कारण एकच भाऊमामा — माझ्या काकीआजीचे भाऊ आम्हाला माहीत होते पण ते येण अशक्य होत. कारण ९२ वर्षांचे भाऊमामा जळगावला बेडरिडन होते.  पण ठरल्यावेळी ३/४ जण आले ,जेवले ,राहीले. आणि ठरल्यावेळी निघून गेले. अगदी आजी सुद्धा या नाटकात सामिल झाली होती. ते लोक गेल्या नंतर समजले की राजस्थानातील शिक्षकसंघाचे अधिकारी अवस्थिजी आणि तेथिल संघाचे भूमिगत असलेले प्रांतप्रचारक , व त्यांचे सहकारी होते. त्यानंतर आणीबाणी संपेपर्यंत असे अनेक भाऊमामा येऊन गेले.

 

एकदा असेच कोणीतरी भाऊमामा आले असताना पोलीस आले. व चौकशी करू लागले. त्यावेळी आजी एकटीच घरी होती. आलेले भाऊमामा आतल्या खोलीत विश्रांती घेत होते. पोलीस खर तर बाबांसाठी आले होते. पण आजीला वाटल भाऊमामांनाच न्यायला आले. तिनी पोलीसांना सांगितल की माझा भाऊ आहे त्याला ताप आलाय म्हणून झोपलाय आणि हे खर वाटाव म्हणून तिने झोपलेल्या त्या भाऊमामांच्या कपाळावर पट्टी सुद्धा ठेवली.

 

असे अनेक प्रसंग ज्यांचीआता गम्मत वाटते पण तेंव्हा मात्र अतिशय तणावपूर्ण वाटलेले प्रसंग अनुभवले.