अनुपमा लिमये यांचा अनुभव

मी जेलमधे गेले तेव्हा वय वर्षे १७ होते. म्हणजे १८ पूर्ण नाही. त्यामुळे सज्ञान नाही. म्हणून पोलिसांनी वडिलांना खूपच  त्रास दिला. म्हणजे ते सरकारी नोकरीत होते. वतरीही त्यांनी मुलीला सरकार विरुध्द फितवले, व आंदोलन करायला लावले. हा त्यांच्यावर ठपका ठेवला होता. आजूबाजूला बेईज्जत होईल एव्हढ्या चौकशा केल्या. नोकरी जाईल की काय एव्हढी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा परिणाम म्हणून पुढिल निवडणूक होऊन कॉंग्रेसचे राज्य जाईपर्यंत वडिल माझ्याशी नीट बोलत नव्हते. एव्हढचं नाही तर, त्यांनी माझे रेशनकार्डावरचे नावही काढून टाकले होते.( त्या काळात रेशन कार्ड  हा अत्यंत महत्वाचा पुरावा -संदर्भ असायचा) पोलिसांना सांगायला की, ही माझ्याकडे रहातच नाही,  म्हणून. आईला खूपच अभिमान वाटत होता. परंतु, ती जाहिरपणे तो दाखवू शकत नव्हती. तिच्या मनातले मी करून दाखवले, म्हणून ती धन्य झाली होती.         खरचं सांगते, आणिबाणी म्हणजे काय ? नक्की काय अन्याय झालायं ? असं जर तेव्हा कुणी विचारलं असतं, तर कशाचंही स्पष्टीकरण देता येण्याची  माझी बौध्दिक क्षमता नव्हती. पण, हा अन्याय आहे. आणि आपण त्याविरूद्ध आवाज उठवलाच पाहिजे, एव्हढे संस्कार समिती व आ.भा.वि.प.मुळेच माझ्यावर झाले होते. व त्याला खतपाणी घातले आमच्या सरांनी - श्री. अनिरूद्ध देशपांडे सरांनी. त्यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत आणिबाणी हा विषय कसा घातक आहे. हे अत्यंत संयमित पण अत्यंत परखड भाषेत आम्हाला सांगितले. आणि त्यावर एक प्रश्न केला.' मग, आपण आता काय करायला हवे ? ' मला चांगलं आठवतयं, मी चटकन म्हटलं,'सत्याग्रह', आधी सगळं शिजलेलचं सरांनी खुबीने आमच्या तोंडून वदविले, इतकेच. हाडाचे शिक्षकच हे करू शकतात. त्यांनाशतशः प्रणाम ! मला  परिणामांची कल्पनाही नव्हती आणि भितीही नव्हती. कारण देशपांडे सरांवरचा दृढ विश्वास !  मग, तयारीला सुरूवात. गुप्त बैठका. त्यात काय, कसं, कोणी, कधी , केव्हा करायचं ह्याची सविस्तर चर्चा. कॉलेज मधे ११ डिसेंबर १९७५ ला सत्याग्रह करायचा असे ठरले. आम्ही बी.एम्. सी.सी. मधे सत्याग्रह केला.श्री. मुकुंदराव तापकिर यांच्या नेतृत्वाखाली. आमला फडके,  हेमा पाध्ये व मी अशा तिघी मुली व श्रीकांत कुलकर्णी , विवेक कुलकर्णी , मधु हत्तर्गी  एव्हढ्यांनी सत्याग्रह केला. आम्हाला अडिच महिन्यांची शिक्षा झाली. परंतु, आम्ही खूप खूश होतो. कारण , बाहेर सर्वत्र बंदी असली, तरी आत आम्ही पूर्ण स्वतंत्र होते व त्यावेळेस ज्या सृजनांचा सहवास लाभला. त्याने माझे जीवन समृद्ध झाले. अरूणा ढेरे, जयवंतीबेन मेहता, सुमतीताई सुकळीकर आणि खूप जणींनी आमच्यावर उत्तम संस्कार केले.

-अनुपमा लिमये