आणीबाणी १९७५मधील आठवणी - श्री. सुनिल गोसावी

१९७५ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी आणीबाणी लादली होती. काही वृतपत्रांनी पहिले पान संपूर्ण काळ्या शाई मध्ये छापून निषेध केला.  मी fergusson college  मध्ये होतो. तरुण वयात काळे पाणी इ. वाचले असल्याने आणि संघ स्वयंसेवक असल्याने देशाभिमान जागृत होता. कॉलेज मधील काही  मित्र आणीबाणी विरुद्ध काय काय करता येईल चा विचार करत होतो. त्या काळात श्री पंत फडके college वर येत असत. तसेच श्री शरद कुंटे ह्यांचाशी संपर्क असे,

प्रथम आम्हीं पद्मावती भागातील कार्यकर्ते  श्री. मेहेंदळे ह्यांचा घरी रात्री एकत्र जमलो जेवण केले आणि एकत्र झोपलो. पहाटे उठून वर्तमानपत्र आणि दुध टाकणार्याच्या वेळेस आणीबाणी विरुद्ध पत्रके घरा घरात टाकली. त्या मुळे पत्रके कोणी टाकली ते कोणाला कळले नाही.

नंतर सत्याग्रह करण्याचे ठरल्या प्रमाणे आम्ही दि. १९ नोव्हेंबर ७५ रोजी ४ वाजता नेहमी प्रमाणे सायकल घेऊन घरा बाहेर पडलो. आईला फक्त जाऊन येतो सांगितले. श्री बाबूजी भागवत ह्याचे घरी जमलो. ग्रुपमध्ये कै. श्री. मधुकरराव देव (पूर्णवेळ प्रचारक), कै. श्री. बाबूजी भागवत (उद्दोग पती), श्री. अरुण गोडसे(औदोगिक  कामगार) , आणि मी , अभय जांभेकर , राजेंद्र कानेटकर , राजेंद्र करंबलेकर  असे चार विद्यार्थी असें विविध  कार्यकर्ते होतो.

तेथून आम्ही सारस बागेत गेलो. गणपतीचे दर्शन घेतले व आणीबाणी विरुद्ध घोषणा देत आणि पत्रके वाटत बागेतून बाहेर आलो. बाहेर येऊन  घोषणा देत आणि पत्रके वाटत अभिनव आर्ट्स कॉलेज चौकाकडे निघालो. हा सर्व प्रकार साधरण ४५ ते ५५ मिनिटे चालू होता. नंतर स्वारगेट पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर श्री मुरगोड ह्यांनी अटक करून महर्षी नगर चौकीत ठेवले. ७ दिवस पोलीस custody मिळाली. जेवायला रोज फरासखाना येतून भत्ता येत होता.

आम्ही चौकीत असताना माझे काका सुकामेवा घेऊन भेटायला आले होते आणि त्या वेळेला सुरीनाम नावाचा देशाने हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले. आम्ही ते सुकामेवा खाऊन चौकीत साजरे केले.

८ दिवसा नंतर आम्हाला येरवडा तुरुंगात magistrate custody म्हणून पाठविले.

तुरुंगात सकाळी प्रातः स्मरण , व्यायाम ,  कांजी चा नाश्ता ( लसून चटणी स्वतः जवळील घालून ), नंतर स्नान कपडे धुणे इ.

जेवण, विश्रांती , दुपारी बौद्धिक , पद्म कार्यक्रम, खेळ ,संध्याकाळी परवचा , स्तोत्रे नंतर  भोजन असे छान दिवस गेले. जेवायला बावन पत्ती भाजी म्हणजे सर्व हिरव्या रंगाच्या भाजा एकत्र . तसेच साप्ताहिक खोबरेल तेल ( अंगाला लावयला ) आणि गुळ खडा मिळे . आम्ही आठवडाभर पोळ्या साठवत असून आणि रविवारी गुळ , खोबरेल तेल घालून लाडू करून रविवार साजरा करत असू .

एका माननीयांनी लाडूचा डबा आणला होता व रात्री हळूच खायचे . कसबा इथल्या काही स्वयंसेवकांना हे कळले व त्यांनी दिवसा सर्वे लाडू काहून डबा परत ठेवला. त्या नंतर त्या माननीय ह्याचा अवतार बघण्या सारखा होता .

त्या वेळला मा.कै. बाळासाहेब देवारासांचा वाढ दिवस केळीच्या खुंटा चे तोरण , बराकी बाहेर रांगोळी घालून , विशेष बौद्धिक करून साजरा झाला. मिसा बंदीना बाहेरून फळे आणि मिठाई येत असे. ते सर्वे आम्हा कच्चा कैद्यांना मिळत असे.

पुढे शिक्षा झाली आणि सत्याग्रही संख्या वाढली त्या मुळे आमच्या सारख्या सुरवातीच्या लोकांना विसापूर येथे पाठविले. मिसा बंद्यांकडून आलेले लाडू आणि चिवडा करंड्या भरून आम्हाले police van मध्ये निरोप म्हणून देण्यात आल्या.

विसापूर हे open jail होते. तलवाच्या जवळ अतिशय रम्य वातावरण होते. जणू काही picnick spot.

तेथेही दिनक्रम येरवडा जेल प्रमाणेच होता. दिवस कसे गेले कळलेच नाही. सुटकेचा दि २६ जानेवारी सोमवार पण सरकारी सुट्टी कैदी सोडता येत नाही , परंतु आदल्या दिवस रविवार साप्ताहिक सुट्टी म्हणून दि.२४ जानेवारी शनिवार रोजी २ दिवस आधी सोडले. रीतसर सुटकेचे प्रमाणपत्र आणि रेल्वे चे warant ( सरकारी नोकरांना, लष्करी लोकांना देतात तसे ) देऊन आमची सुटका झाली.

असे ते रम्य दिवस.